पुणे जिल्ह्यात लग्नसमारंभांवर पुन्हा निर्बंध लादले जाऊ शकतात. स्थानिक प्रशासनाकडून तशा जोरदार हालचाली सुरु
पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला लागली आहे
पुणे जिल्ह्यात लग्नसमारंभांवर पुन्हा निर्बंध लादले जाऊ शकतात. स्थानिक प्रशासनाकडून तशा जोरदार हालचाली सुरु
पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला लागली आहे
पुणे: बारामती वार्तापत्र रिपोर्ट
नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम सर्रास धाब्यावर बसवले जात असल्याने आता पुणे जिल्ह्यात प्रशासनाकडून मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात पुणे जिल्ह्यात लग्नसमारंभांवर पुन्हा निर्बंध लादले जाऊ शकतात. स्थानिक प्रशासनाकडून तशा जोरदार हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला लागली आहे. गेल्यावर्षी कोरोनाची साथ शिगेला असताना पुणे जिल्हा हा हॉटस्पॉट बनला होता. तशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून यावेळी स्थानिक प्रशासनाकडून कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून लग्नसमारंभांवर पुन्हा एकदा निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सतर्कतेचे आदेश
नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुण्यात आजपासून मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कडक कारवाईला प्रारंभ होणार आहे. तालुका स्तरावर कोरोनाची आढावा बैठक होऊन निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
लग्नाच्या हॉलमध्ये घुसून कारवाई, 10 हजारांच्या दंडाची वसूली
कोरोनाचे निर्बंध असूनही लग्नसमारंभ धुमधडाक्यात साजरे करणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. मात्र, नागपुरात अशाच एका लग्नात प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. सध्याच्या नियमानुसार लग्नाला 100 माणसं बोलावण्याची मुभा आहे. मात्र, या लग्नाला 250 हून अधिक लोक आले होते. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने या लग्नात जाऊन कारवाई केली. या लग्नात निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त लोक असल्याने आयोजकांना पाच हजार आणि सभागृहाच्या मालकांकडून पाच हजारांचा दंड आकारण्यात आला. नागपूर प्रशासनाकडून शहरातील सात मंगल कार्यालयांवर अशाप्रकारची कारवाई करण्यात आली आहे.
…तर लॉकडाऊन करावाच लागेल; राजेश टोपेंच्या स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला लागल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्त्वाचा खुलासा केला. लॉकडाऊन हा आमच्यासाठी अंतिम पर्याय असेल, असे टोपे यांनी स्पष्ट केले.