वीज तोडणी मोहीम हे राज्य शासनचे अपयश – हर्षवर्धन पाटील
शेतीपंपांची वीज पूर्ववत करण्याची मागणी

वीज तोडणी मोहीम हे राज्य शासनचे अपयश – हर्षवर्धन पाटील
शेतीपंपांची वीज पूर्ववत करण्याची मागणी
इंदापूर:प्रतिनिधी
चालू वर्षी शेतकरी बांधव हे कोरोना, त्यानंतर झालेली तीव्र अतिवृष्टी शेती नुकसानीत जाऊन आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला आहे. शेतकऱ्यांना अडचणीच्या परिस्थितीत दिलासा देणे आवश्यक असताना, महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम जुलमी पद्धतीने राबवित आहे. शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे, अशी टीका भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.
सध्या इंदापूर तालुक्याचे काठावरती पास झालेले राज्यमंत्री हे विकासाच्या पोकळ गप्पा मारत आहेत. मात्र सध्याच्या वीज तोडणी मोहिमे संदर्भात सध्या एक शब्दही बोलत नाहीत. कोरोना, अतिवृष्टी तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज तोडणीमुळे शेतातील पिके जळून चालली आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत न पाहता महाआघाडी सरकारने तात्काळ शेतीपंपांचा वीज पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली.
शेतीसाठी वीजपुरवठा महत्त्वाचा असल्याने माझ्या मंत्रिपदाच्या काळात वीज उपकेंद्राची मोठ्या संख्येने निर्मिती केली.तसेच माझ्या काळातील एकदाही शेतकऱ्यांची वीज तोडली नाही. मात्र आताच्या राज्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांवर वीज तोडीचे संकट टाकले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून चारा पिके, भाजीपाला पिके करपून चालली आहेत, त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
*इंदापूर तालुक्यात सर्वाधिक वीज उपकेंद्रांचे जाळे*
मी वीस वर्षे मंत्रीपदाच्या काळात काय केले असे विचारणार्या राज्यमंत्र्यांनी त्यांच्या काळात तालुक्यातील एक तरी वीज उपकेंद्र उभे केले का? उलट मी राज्यात सर्वाधिक वीज उपकेंद्रांचे जाळे इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण केले आहे. त्यामुळे गेली २५ वर्षात शेतीला पुरेशा दाबाने व नियमितपणे वीजपुरवठा होत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.