मुंबई

वैद्यकीय शिक्षण विभागाची वर्ग १ ते ४ ची पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

वर्ग 3 आणि वर्ग 4 ची पदभरती झाल्यास इतर कर्मचाऱ्यांवर त्याचा ताण येणार नाही.

वैद्यकीय शिक्षण विभागाची वर्ग १ ते ४ ची पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

वर्ग 3 आणि वर्ग 4 ची पदभरती झाल्यास इतर कर्मचाऱ्यांवर त्याचा ताण येणार नाही.

मुंबई ; बारामती वार्तापत्र रिपोर्ट

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत वर्ग १ ते वर्ग ४ या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेसंदर्भातील कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत अध्यापकीय पदांच्या तदर्थ पदोन्नतीबाबत आढावा बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर, उपसचिव संजय सुरवसे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, वर्ग 1 मध्ये प्राध्यापक, वर्ग  2 मध्ये सहयोगी प्राध्यापक, आणि वर्ग 3 आणि वर्ग 4 मधील रिक्त पदे सध्या 50 टक्क्यांपर्यंत भरण्याबाबतची मंजुरी मिळालेली आहे. तर वर्ग 4 मधील पदे वैद्यकीय शिक्षण विभागच्या अखत्यारित येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांना कंत्राटी पध्दतीने भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी याबाबत कार्यवाही करुन ही पदे तातडीने भरावी. तसेच वर्ग-3 संदर्भात मंजूर पदापैकी 50 टक्के पदे भरण्याची परवानगी राज्य शासनाची असल्याने याबाबतची जाहिरात कालबध्द वेळेत प्रसिद्ध करुन या भरती प्रक्रियेला गती द्यावी, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले.

राज्यात अजूनही कोविडचा धोका टळलेला नसून शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयांमध्ये सतत वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासत असते. वेळेत वर्ग 3 आणि वर्ग 4 ची पदभरती झाल्यास इतर कर्मचाऱ्यांवर त्याचा ताण येणार नाही. याशिवाय तदर्थ पदोन्नतीसारखे विषय विभागीय निवड समितीसमोर मांडून वेळेत त्याबाबत निर्णय घेण्याला गती देण्यात यावी, असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Back to top button