सातारा जिल्ह्यातील वाठार, करंजखोप ,सोनके या पट्ट्यात जबरदस्त गारपीट, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान !
फळपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील वाठार, करंजखोप ,सोनके या पट्ट्यात जबरदस्त गारपीट, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान !
फळपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सातारा ; बारामती वार्तापत्र
अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आज मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. आधीच कोरोनामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्याच्या जखमेवर या गारपिटीने मीठ चोळण्याचा प्रकार आज घडला.
सातारा जिल्ह्यातील करंजखोप, सोनके, नायगाव, पिंपोडे, घेघेवाडी, वॉठार स्टेशन यासह आसपासच्या गावांमध्ये आज दुपारी तीन वाजता चे दरम्यान मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट झाली.
या गारांचा आकारही काही ठिकाणी अंड्या एवढा तर काही ठिकाणी लिंबाच्या आकाराच्या गारा आज टप टप पडत होत्या. या गारांचा रस्त्यावर आणि शेतामध्ये खच पडला होता.
काही ठिकाणी पावसाच्या पाण्याने शेतातील ताली फुटून पाणी वाहून गेले या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या कांदा-टोमॅटो ,पावटा, आले, त्याचबरोबर गुरांच्या चाऱ्यासाठी असलेले मका ,कडवळ याचे सुद्धा पूर्णपणे नुकसान होऊन पिके जमीनदोस्त झाली. उसासारख्या पिकावर तर गारांच्या माऱ्यामुळे केरसुनी च्या फडाप्रमाणे उसाची अवस्था झाली आहे ऊसाला दोन किंवा तीनच पाने शिल्लक राहिली आहेत.
फळपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या आंब्याची फळे कैरी अवस्थेत असून ही फळे ही गारपिटीमुळे जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे न भूतो न भविष्यती असे नुकसान झाले आहे. शासनाने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी येथील शेतकरी मागणी करत आहेत.
आज आमच्या वाठार ते करंजखोप व परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस व गारपीट झाल्याने आमच्या सर्व शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. जिवापाड सांभाळलेली पिके या पावसाने अर्ध्या तासात जमीनदोस्त केली. या पिकांवर चार पैसे मिळतील या आशेने आम्ही कष्ट करत होतो मात्र आम्हाला या गारपिटीमुळे पूर्णपणे नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. आम्हाला परत उभे राहण्यासाठी फार मोठी आर्थिक किंमत मोजावी लागणार आहे.
सूर्यकांत धुमाळ ,शेतकरी ,सोनके