रविराज तावरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी; पुण्यातील डॉ. सुरेज चव्हाण व सहकाऱ्यांनी केली शस्त्रक्रिया
गेल्या दोन महिन्यांमध्ये बारामती येथे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हा तिसरा हल्ला आहे.

रविराज तावरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी; पुण्यातील डॉ. सुरेज चव्हाण व सहकाऱ्यांनी केली शस्त्रक्रिया
गेल्या दोन महिन्यांमध्ये बारामती येथे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हा तिसरा हल्ला आहे.
काल झालेल्या गोळीबारात जखमी झालेले राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे यांच्यावर बारामतीच्या गिरीराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. काल रात्री उशीरा त्यांच्या फुफ्फुसाशेजारील नाजूक भागाची शस्त्रक्रिया करण्यात आली. पुण्याचे सुप्रसिद्ध हृदयतज्ञ डॉ. सुरेज चहाण व यांच्या सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया केली.
रविराज तावरे हे पत्नी- जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्यासह सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास संभाजीनगरला वडापाव घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर गाडीकडे येत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या दोघा जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर तावरे खाली कोसळले. तर गाडीमध्ये बसलेल्या त्यांच्या पत्नी रोहिणी तावरे यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे या परिसरात क्रिकेट खेळणारी मुले धावत आली. तोपर्यंत हल्लेखोरांनी गोळीबार करुन पळ काढला होता. जखमी अवस्थेतील तावरेंना तातडीने मित्राच्या कारमधून बारामती येथील खासगी रुग्णालयात हलवले.
रविराज तावरे हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले रविराज तावरे यांच्या पत्नी रोहिणी तावरे या पणदरे-माळेगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या आहेत. माळेगावची ग्रामपंचायत रद्द होऊन नुकतीच नगरपंचायत झाली. येत्या काही काळात नगरपंचायत निवडणूक होणार आहे. गाव पातळीवरील राजकारणातून हा प्रकार झाला असावा असा संशय व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस आणि वैद्यकीय यंत्रणेशी संपर्क साधत सूचना केल्या. या घटनेनंतर माळेगावमधील वातावरण तणावपूर्ण बनले असून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
रविराज तावरे यांच्यावर बारामतीतील गिरीराज हॉस्पीटल येथे उपचार सुरु आहेत. रात्री उशीरा त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या छातीतून एक गोळी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले असून सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉ. सुरेज चव्हाण ,डॉ. रमेश भोईटे यांनी सांगितले.
गेल्या दोन महिन्यांमध्ये बारामती येथे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हा तिसरा हल्ला आहे. १) छत्रपती चे संचालक श्री बागल २) राष्ट्रवादीचे सचिव मोसिन पठाण व ३) रविराज तावरे या तीन जणांवर झालेल्या हल्ल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काय पवित्रा घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.