रविराज तावरे गोळीबार प्रकरणी चौघांना मोक्काची कारवाई
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयावर

रविराज तावरे गोळीबार प्रकरणी चौघांना मोक्काची कारवाई
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयावर
क्राईम ;बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरे गोळीबार प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. एका अल्पवयीन मुलासह चौघांवर बारामती तालुका पोलिसांनी कारवाई केली. गेल्या महिन्यात पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील माळेगाव येथील जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. चौघा आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
रविराज तावरे यांच्यावर माळेगाव येथे 31 मे रोजी गोळीबार झाला होता. या प्रकरणी प्रशांत मोरे, विनोद उर्फ टॉम मोरे, रिबेल उर्फ राहुल यादव आणि एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करत त्यांना अवघ्या सात तासात अटक करण्यात आली होती. बारामतीच्या इतिहासात प्रथमच एका राजकीय नेत्यावर हल्ल्याची घटना घडली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या रविराज यांच्यावरील गोळीबाराने तालुक्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी घटनेनंतर पाच तासांतच आरोपींना जेरबंद केले होते. पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनेदिवशीच पोलिस अधिक्षकांनी कठोर कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार अवघ्या 15 दिवसांत या टोळीवर मोक्कातर्गत कारवाई करण्यात आली.
जिल्हा परिषद सदस्य पदाच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांचा रोष मनात धरून फिर्यादी व त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न मोरे टोळीकडून केला जात होता. त्यातून राजकिय व आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने रविराज यांना संपवून दहशत माजविण्यासाठी कट रचून अल्पवयीन मुलामार्फत खूनी हल्ला केला गेला. पोलिसांनी प्राणघातक हल्ल्यासह शस्त्र अधिनियम 120 ब आदी कलमांनुसार मोरे टोळीवर गुन्हा दाखल केला होता.
या टोळीतील सदस्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. प्रशांत मोरे याच्यावर नऊ, विनोद मोरे याच्यावर सात तर राहूल मोरे याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. खून, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक ढवाण यांनी पोलिस अधिक्षकांमार्फत मोक्काचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे पाठवला होता. त्याला नुकतीच मंजूरी मिळाली.
नेमकं काय घडलं?
रविराज तावरे हे पत्नी- जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्यासह 31 मे रोजी सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास संभाजीनगरला वडापाव घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर गाडीकडे येत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या दोघा जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर तावरे खाली कोसळले. तर गाडीमध्ये बसलेल्या त्यांच्या पत्नी रोहिणी तावरे यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे या परिसरात क्रिकेट खेळणारी मुले धावत आली. तोपर्यंत हल्लेखोरांनी गोळीबार करुन पळ काढला होता. जखमी अवस्थेतील तावरेंना तातडीने मित्राच्या कारमधून बारामती येथील खासगी रुग्णालयात हलवले.
उपमुख्यमंत्र्यांनी घातले होते लक्ष
माळेगावातील युवा नेते रविराज तावरे यांच्यावरील गोळीबार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले होते. त्यांनी रविराज यांच्यावरील उपचारांसंबंधी वैद्यकिय पथकाला सुचना केल्या होत्या. दुसरीकडे पोलिस प्रशासनाला आरोपींविरोधात कडक कारवाईचे निर्देश दिले होते.
अवघ्या 15 दिवसांत मोक्का
एखाद्या घटनेनंतर मोक्काचा प्रस्ताव तयार करणे, तो पाठवणे आणि विशेष पोलिस महानिरीक्षकांची त्याला मंजूरी मिळणे ही सगळी प्रक्रिया या घटनेत अवघ्या 15 दिवसांत पार पडली. बारामतीत अत्यंत जलद गतीने झालेली ही पहिलीच कारवाई आहे.
– मिलिंद मोहिते, अप्पर पोलिस अधिक्षक, बारामती विभाग
सदरची कारवाई श्री.डॉ अभिनव देशमुख सो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, श्री. मिलींद मोहीते सो अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग बारामती, श्री.नारायण शिसगावकर सो उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग बारामती ,श्री महेश व्याण सो पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस स्टेशन, पोलीस हवालदार सुरेश भोई व नं १०३, पोलीस नाईक सुरेश दडस व नं ५१४, पोलीस नाईक परिमल मानेर व नं २१५१ यांनी केलेली आहे.