स्थानिक

आरोग्य सुविधा नागरिकांना मिळणार घरपोच…

आरोग्य सुविधा नागरिकांना मिळणार घरपोच…

मा.ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रोहित पवार यांचा उपक्रम…

बारामती वार्तापत्र

कर्जत-जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार आपल्या सृजनशील सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून लोकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून आणि बारामती अॅग्रो लिमिटेडच्या माध्यमातून मोबाईल क्लिनिक व्हॅन (फिरता दवाखाना) या उपक्रमाचे उद्घाटन गुरुवारी, २२ जुलै रोजी सकाळी ८:३० वाजता शासकीय महिला रुग्णालय बारामती येथे आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री व अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या, विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

कोरोनाच्या संकटकाळात संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत आपले कर्तव्य बजावत आहे. रुग्णांना सर्व सोयीसुविधा पुरविण्यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणा दिवसरात्र तत्पर आहे. मात्र कोरोनाला आळा घालताना इतर आजार असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना योग्यवेळी आरोग्याच्या सुविधा तात्काळ उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून आणि बारामती अॅग्रो लिमिटेडच्या माध्यमातून बारामतीकरांसाठी मोबाईल क्लिनिक व्हॅन(फिरता दवाखाना) उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोविड पूर्व काळात आ. रोहित पवार यांच्यावतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत होते, नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळून सुमारे २५ हजार हून अधिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला. सध्याच्या कोरोना महामारीमुळे राज्यात लागू असलेल्या निर्बंधांच्या अनुषंगाने चालू वर्षी मोठ्या प्रमाणात नागरिकांना एकत्र येण्यावर मर्यादा आहेत. लोकांना आरोग्याच्या सुविधेपासून वंचित राहावे लागू नये, त्यांना वाहतुकीच्या साधनांच्या कमतरतेमुळे त्रास सहन करावा लागू नये यासाठी आमदार रोहित पवार यांनी थेट नागरिकांच्या दारात मोफत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी यंत्रणा उपलब्ध केली आहे. फिरता दवाखान्याच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी, औषधे(सामान्य आजार), मधुमेह व रक्तदाब(बी.पी.) तपासणी या सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत.

२२ जुलैपासून पुढील एक महिना बारामतीतील सर्व सामान्य नागरिकांसाठी हा उपक्रम राबविला जाणार असून सर्वांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री व अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या, विश्वस्त सौ. सुनंदा पवार यांनी केले आहे. मोबाईल क्लिनिक व्हॅन (फिरता दवाखाना) या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी सभापती निताताई फरांदे, उपसभापती रोहित कोकरे, नगराध्यक्षा पौर्णिमाताई तावरे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, महिला शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सदानंद काळे आणि डॉ. बापू भोई यांच्यासह पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!