इंदापूर पोलीस व महसूल विभागाची संयुक्त कारवाई ; वाळू उपसा करणाऱ्या बोटी उद्धवस्त
धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले

इंदापूर पोलीस व महसूल विभागाची संयुक्त कारवाई ; वाळू उपसा करणाऱ्या बोटी उद्धवस्त
धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले
इंदापूर : प्रतिनिधी
उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातील गंगावळण भागात अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिकी बोटी इंदापूर पोलीस व महसूल विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत शनिवारी (दि.३१) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उद्धवस्त करण्यात आल्या असून सदरील कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
सदरील करवाईमध्ये एकूण ४० लाख रुपये किंमतीच्या वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिकी बोटी जिलेटीनच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. वाळू माफियांवर धडक कारवाई चालू असून संबंधितांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. निर्ढावलेल्या वाळू माफियांकडून उजनी पाणलोट क्षेत्रात
महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ टाकत अवैधरित्या वाळू तस्करी निर्धास्तपणे चालू होती. अवैद्य वाळूचा उपसा करणाऱ्यांच्या बोटी जिलेटिन च्या साह्याने उडवल्या जातात मात्र संबंधित प्रशासनासह पोलिसांनी वाळूचा उपसा करणाऱ्या बोटीचे मालक, बोटीचे चालक यांसह वाळू उपशाला प्रोत्साहन देणाऱ्यासह पाठराखण करणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी देखील होत आहे.
सदरील कारवाईमध्ये तहसीलदार अनिल ठोंबरे,पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने,पो.शि अमोल गारुडी,समाधान केसकर,राजू नवले,अर्जुन भालसिंग,पो.पाटील राजेंद्र शिंदे,अरुण कांबळे,संजय राऊत यांसह महसूल विभागाचे कर्मचारी सहभागी होते.
सदरील कारवाईच्या ठिकाणी जाताना अवैध वाळू उपसा करणार्यांना कळू नये म्हणून तहसीलदार अनिल ठोंबरे व पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी पिकअप मधून प्रवास करत त्या ठिकाणी जाऊन अचानक कारवाई केली.