पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर घडला सिने स्टाईल थरार…
पोलिसांनी १० लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत

पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर घडला सिने स्टाईल थरार…
पोलिसांनी १० लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत
इंदापूर : प्रतिनिधी
पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग बुधवारी (दि.११) रात्री पोलीस आणि डिझेल चोरांमध्ये अगदी सिने स्टाईल थरार घडला.यामध्ये डिझेल चोरी करणारे फरार झाले असून इंदापूर पोलिसांनी १० लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई विठ्ठल धोंडीराम नलवडे ( वय २८ वर्षे ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर घटना अशी की,पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (दि.११) रात्री २:५० च्या सुमारास पोलीस शिपाई विठ्ठल नलवडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री धनवे हे एमएच१२टीएच २८८५ या सरकारी वाहनातून इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना ठाणे अंमलदार पोलीस नाईक श्री. चव्हाण यांनी मिळालेल्या माहितीनुसार फोनद्वारे गस्त घालणाऱ्या पथकास डिझेल चोरी करून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक बाबत कळवले. सदरी मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने ट्रक बाबत शोध घेत असताना लोणी एमआयडीसी चौकातून भरधाव वेगाने संशयीत ट्रक पुण्याकडे जाताना दिसल्याने पोलिसांनी ट्रक चा पाठलाग करून डाळज गावाजवळ सदरील ट्रकला ओव्हरटेक करून थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु चालकाने ट्रक भरधाव वेगाने चालवून जीवे मारण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या अंगावर घातल्याने पोलिसांचे वाहन बाजूला गेले नंतर पुन्हा पाठलाग सुरू केला असता चालकाने ट्रक सर्विस रोडने घेऊन भिगवण मार्गे पुढे निघाला तेव्हा भिगवन ते डिकसळ गावा दरम्यान रस्त्यावर ट्रक मधील चालका सोबत असलेल्या साथीदारांने ट्रक च्या पाठीमाघील बाजूस येवून ट्रक मधील डिझेल ड्रम,डिझेल,टायर पोलिसांच्या दिशेने फेकून मारले.
त्यानंतर काही अंतर पुढे गेल्यानंतर रेल्वे रुळाचे गेट आढवे आल्याने चालकाने ट्रक भरधाव वेगाने चालवून रेल्वे फाटक तोडून रेल्वेच्या मालमतेचे नुकसान करून पुढे निघून गेला. राशीन रोडला लागल्यानंतर सदर ट्रक चालक व त्याचा साथीदार यांनी त्यांचे ताब्यातील ट्रक रस्त्यावर लावून पळून गेले. सदरील घटनास्थळावरून पोलिसांनी १० लाख रुपये किंमतीचा निळ्या-पिवळ्या रंगाचे केबीन व विटकरी रंगाची बॉडी असणारा दहा टायर ट्रक एमपी०९ एचएफ ८७४६ ,शंभर रुपये किंमतीचा डिझेल काढण्यासाठी लागणारा हिरव्या रंगाचा पाईप,२८ हजार रुपये किंमतीचे प्रत्येकी ३५ लिटर डिझेलने भरलेले निळ्या रंगाचे ८ कॅन्ड,७५० रुपये किंमतीचे निळ्या रंगाचे २५ कॅन्ड असा एकूण १० लाख २८ हजार ८५० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरील ट्रक चालकासह साथीदार यांच्यावर भा.द.वि कलम ३०७,३५३,३७९,३४ सह रेल्वे अधिनियम १९८९ चे कलम ३ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.
ट्रक बाबत संशय आल्यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे जेष्ठ बंधू कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांनी याबाबत इंदापूर पोलिसांना कळविले आणि ते सुद्धा स्वतःच्या वाहनातून पोलिसांच्या मदतीसाठी धावले.त्यांनी जागरूक नागरिकाचे कर्तव्य बजावले.