डोळ्यासमोर उद्ध्वस्त झालं कुटुंब ,टायर फुटून कार धरणात बुडाली,, महिलेचा मृत्यू, पती आणि मुलाला वाचवलं
सुट्टीनिमित्त पर्यटानासाठी गेलेल्या देशपांडे कुटुंब पानशेत धरण परिसरात
डोळ्यासमोर उद्ध्वस्त झालं कुटुंब ,टायर फुटून कार धरणात बुडाली,, महिलेचा मृत्यू, पती आणि मुलाला वाचवलं
सुट्टीनिमित्त पर्यटानासाठी गेलेल्या देशपांडे कुटुंब पानशेत धरण परिसरात
पुणे :बारामती वार्तापत्र
१५ ऑगस्टची सुट्टी पुण्यातल्या देशपांडे कुटुंबासाठी अतिशय दुर्दैवी ठरली आहे. सुट्टीनिमित्त पर्यटानासाठी गेलेल्या देशपांडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. देशपांडे कुटुंब पानशेत धरण परिसरात पर्यटनासाठी गेलेलं असताना त्यांच्या कारचं टायर फुटलं आणि कार थेट पानशेत धरणात बुडाली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे तर पती आणि मुलाला वाचवण्यात यश आलं आहे.
असा घडला अपघात
काल १५ ऑगस्टची सुट्टी असल्याने शनिवार पेठेत राहणारे योगेश देशपांडे हे पत्नी समृद्धी आणि मुलासोबत सकाळी पानशेतच्या दिशेने कारने फिरण्यास गेले होते. दुपारी पानशेतहून पुण्याकडे येत असताना त्यांच्या कारचं टायर फुटलं आणि त्यांचं कारवरचं नियंत्रण सुटलं. त्यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला पण, कार थेट पानशेत धरणात बुडाली. गाडी चालवत असलेले योगेश आणि समोर बसलेला त्यांच्या मुलाने परिस्थिती पाहून लगेच गाडीच्या बाहेर उडी घेतली.
महिलेचा मृत्यू; पती, मुलाला दुखापत
गाडी धरणात बुडाली आहे, हे पाहून रस्त्याच्या शेजारी असलेले नागरिक मदतीला धावले. त्यांनी योगश देशपांडे आणि त्यांच्या मुलाला धरणाच्या बाहेर काढलं. शेजारच्या हॉटेलमधील एकाने पाण्यात उडी घेत कारच्या टायरला दोरी बांधून झाडाला बांधली. ज्यामुळे कार पूर्णपणे पाण्यात बुडाली नाही. यावेळी समृद्धी यांना बाहेर काढताना त्यांना अडचणी आल्या. कारच्या मागची काच फोडून समृद्धी यांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
डोळ्यासमोर उद्ध्वस्त झालं कुटुंब
१५ ऑगस्टची सुट्टी असल्यानं देशपांडे कुटुंब फिरण्यासाठी पानशेत परिसरात आलं होतं. दिवसभर फेरफटका मारल्यानंतर त्यांनी सोबत एका ठिकाणी नाश्ता केला. दुपारी दोनच्या सुमारास पुण्याकडे जात असताना योगेश कार चालवत होते तर त्यांचा मुलगा शेजारी बसला होता आणि समृद्धी या मागे बसल्या होत्या. पानशेत धरणाच्या बाजूने जात असताना अचानक टायर फुटलं आणि कार धरणात गेली. यावेळी समोरच्या खिडक्या उघडल्या असल्यानं योगेश आणि त्यांचा मुलगा लगेच बाहेर आले. पण मागच्या खिडक्या बंद असल्याने समृद्धी बाहेर पडू शकल्या नाहीत.