जगाला हेवा वाटेल अशी भारतीय लोकशाही : हर्षवर्धन पाटील
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
जगाला हेवा वाटेल अशी भारतीय लोकशाही : हर्षवर्धन पाटील
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी भारताला स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षात आपल्याला काय मिळाले याचे आपण अवलोकन केले तर आपण लोकशाही मिळवली. जगाला भारतीय लोकशाही बद्दल हेवा वाटतो एवढे कर्तुत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेचा आधार ठेवून अनेक पिढ्या, अनेक पक्ष, अनेक नेते या ७४ वर्षात पुढे आले. अनेक सरकारे आले अनेक सरकारे गेली परंतु आपल्या लोकशाहीचा आराखडा ( ढाचा ) अबाधित राहिला आहे हे मोठे योगदान आपल्याला मिळाले असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ आज आपण आपल्या भारत देशाचा ७५ अर्थात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. हा एक राष्ट्रीय सण म्हणून आपण सर्वजण उत्साहात साजरा करीत असतो. यानिमित्ताने मी आपणास शुभेच्छा देतो. स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या स्वातंत्र्य सेनानी, वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्या सर्वांच्या प्रतिमेला मी नम्रपणे अभिवादन करतो. भारतीय लोकशाही वृद्धिंगत होत असून पूर्वीच्या परिस्थितीची तुलना करता आज भारताची मोठी प्रगती झाली आहे.
प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रम तसेच नव्याने सुरू होणारे अभ्यासक्रम या विषयाची माहिती दिली. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात नवराष्ट्र निर्मितीची संकल्पना मांडल्याचे सांगितले. तसेच त्यांनी ध्वजा विषयीची माहिती दिली.
यावेळी संस्थेचे सहसचिव प्रा. बाळासाहेब खटके, खजिनदार ॲड.मनोहर चौधरी, विकास मोरे, नारायणदास रामदास प्रशालेचे मुख्याध्यापक विकास फलफले, क्रीडाशिक्षक बापू घोगरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्टनंट प्रा. बाळासाहेब काळे यांनी केले. आभार उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यांनी मानले