कृषी महाविद्यालय,बारामती येथील कृषी कन्येचे जाणून घेतली टोमॅटो पिकातील विक्रमी उत्पादनाची यशोगाथा
खर्च वजा जाता सुमारे 12 लाख 85 हजारा चा नफा

कृषी महाविद्यालय,बारामती येथील कृषी कन्येचे जाणून घेतली टोमॅटो पिकातील विक्रमी उत्पादनाची यशोगाथा
खर्च वजा जाता सुमारे 12 लाख 85 हजारा चा नफा
बारामती वार्तापत्र
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे ,कृषी महाविद्यालय ,बारामती येथील चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी कृषिकन्या तेजश्री तात्याबा खोरे हिने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी मारुती रामभाऊ पानसरे यांच्या टोमॅटो उत्पादनातील यशाचा आढावा घेतला आहे.
उत्तम शेती मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असे आपल्याकडे सर्व जण म्हणत असतात.
शेती मध्ये वाढलेला खर्च व शेत मालाचे उतरलेले बाजार भाव यामुळे शेती करणाऱ्याला वाटते की उत्तम नोकरी व कनिष्ठ शेती .शेती मध्ये परवडत नाही पण आपल्या शेतामध्ये टोमॅटोचे भरघोस उत्पादन घेत शेती ही कशी परवडत आहे हे पटवून दिले आहे. वडगाव निंबाळकर येथील प्रगतीशील शेतकरी श्री. मारुती रामभाऊ पानसरे यांनी श्री. पानसरे यांनी उत्तम प्रतीची, दर्जेदार, लालभडक फळे उत्पादित करून व्यापारी व ग्राहक यांना खरेदीचे समाधान तर दिलेच पण याशिवाय शेतकऱ्याला टोमॅटोची उत्तम नियोजन केले तर अधिक आर्थिक लाभ कसा मिळू शकतो याचे आदर्श उदाहरण शेतकऱ्यांसमोर ठेवले आहे.
श्री. पानसरे हे शेतीमध्ये सतत वेगवेगळे प्रयोग करीत असतात. या प्रयोगातून त्यांनी टोमॅटो लागवडीतून भरघोस व विक्रमी उत्पादन घेतले व मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळवला टोमॅटो लागवड करताना त्यांनी प्रथम मध्यम ते भारी जमिनीची निवड केली. पूर्वमशागत करताना प्रथम चांगली नांगरट करून पाया घालून व नंतर रोटावेटर मारून तसेच शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात केला त्यानंतर त्यांनी सदर जमिनी मध्ये चार फुटी सरी काढली व फेब्रुवारी महिन्याच्या दुसर्या आठवड्यात सुमारे पावणेदोन एकर क्षेत्रावर अन्सल टोमॅटो जातीच्या 22 दिवस वयाच्या रोपांची लागण शेतामध्ये केली यासाठी कृषिराज हायटेक नर्सरी पाचवडचे नाना कदम यांनी त्यांना मार्गदर्शन केले साधारणपणे एकरी साडेआठ हजार ते नऊ हजार रोपांची लागण त्यांनी आपल्या शेतामध्ये केली. टोमॅटो लागवड करण्यापूर्वी त्यांनी रोपे ट्रे मध्ये असताना बीनिया याऔषधाची फवारणी केली.
खत आणि पाणी व्यवस्थापन
रोपांची लागण करत असताना रासायनिक खताचा योग्य प्रमाणात वापर जर असेल तर झाडांची वाढ योग्य होती यासाठी त्यांनी प्रथम 10: 26: 26 या रासायनिक खतांची मात्र एकरी तीन बॅग व सेंद्रिय खतामध्ये निंबोळी पेंड एकरी चार बॅग, मायक्रोन्यूट्रिएंट पाच किलो प्रती एकर चा पहिला डोस दिला व लागण केल्यानंतर 20 दिवसांनी मातीची पहिली भर दिली त्यानंतर पुन्हा पीक 30 दिवसांचे झाल्यानंतर शेणखताचा पुन्हा एकदा डोस दिला व पुन्हा सरीला दुसरी भर दिली यामुळे झाडांच्या मुळांची वाढ चांगली होते व रोपांना चांगला आधार मिळतो. उत्पादनातही वाढ होण्यास मदत होते. याशिवाय पाणी व्यवस्थापन करत असताना रोपे लागवडी नंतर प्रथम त्यांनी पाठ पाणी दिली व नंतर दुसरे किंवा आंबवणी देण्यासाठी शेतांमध्ये ड्रीप अंथरून वाढत्या तापमानाचा विचार करून पिकाच्या आवश्यकतेनुसार ड्रिप ने पाण्याचे व्यवस्थापन केले. तसेच पाणी व्यवस्थापन करत असताना पीक फुलोऱ्यात येईपर्यंत पाणी बेताने दिले. उन्हाळ्यात पाण्याची जास्त गरज आहे असे दिसून आल्यानंतर त्यांनी मध्यंतरी पाठ पाणी देण्याचे नियोजन केले अधिक झालेले पाणी किंवा पाण्याचा ताण टोमॅटो पिकास सहन होत नसल्यामुळे सुयोग्य पाणी व्यवस्थापन त्यांनी केले.
फवारणी व किड नियंत्रण
टोमॅटो पीक हे तीनही हंगामात येत असल्यामुळे या पिकावर कीड व रोगाचा वाढता प्रादुर्भाव तसेच फळांची प्रत व उत्पादन वाढीच्या दृष्टीने फवारणी व कीड नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे असते. पिकाची पिकावरील किडी व रोगाची लक्षणे दिसताच नियंत्रणात्मक उपाययोजना करणे गरजेचे असते. यासाठी टोमॅटो पिकावर पडणार्या प्रमुख रोगांपैकी मावा, नाग अळी, लाल कोळी यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो. यासाठी दर आठ दिवसांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने कीटकनाशकांची फवारणी त्यांनी केली. यामध्ये त्यांनी मॅलेथिऑन, डायमिथोएट, लाल कोळी साठी डायकोफॉल रसायनांची फवारणी त्यांनी शेतामध्ये केली. याशिवाय फॉलियार स्प्रे साठी सूक्ष्म अन्नद्रव्यांची ही त्यांनी फवारणी केली.
बांधणी व उत्पादन
टोमॅटो झाडांची योग्य संवर्धन होण्यासाठी उत्पादन वाढीसाठी योग्य प्रकारची बांधणी व स्टेज यांची आवश्यकता असते. ती सर्वसाधारणपणे 40 दिवसाची झाल्यानंतर तार, काठी वापरून त्यांनी स्टेजिंग तयार केले व सुतळीच्या साह्याने टोमॅटो झाड सहजपणे बांधली. सर्वसाधारणपणे पिकाचे उत्पादन 65 ते 70 दिवसांनी सुरू झाले प्रथम त्यांनी पिकलेली हिरवट रंगाची टोमॅटो तोडण्यास सुरुवात केली. पुढे दिवसाआड तोडणी सुरू केली. केल्यानंतर प्रतवारी मध्ये रोगट तडा गेलेली लहान फळे बाजूला केली व उत्तम दर्जाची फळे क्रिकेटमधून भरली पाच ते सहा दिवस कोणत्याही प्रकारची फवारणी केली नाही. फळांचा उत्तम दर्जा रंग आकर्षकपणा व वजन या गोष्टींमुळे शेताच्या बांधावरच् व्यापाऱ्यांनी टोमॅटो खरेदी केला. यामुळे वाहतूक खर्चात पूर्णपणे बचत झाली. टोमॅटो थोडा पुढे 40 ते 45 दिवस चालू राहिला व अधिक उत्पादन मिळाले. टोमॅटो क्षेत्रामध्ये सुमारे 81 टन उत्पादन मिळाले. साधारणपणे चारशे ते पाचशे रुपये एवढा बाजार भाव शेतावरच मिळाला व यातून सुमारे सोळा लाख रुपये आर्थिक उत्पादन मिळाले. तर एकूण खर्च सव्वातीन लाख झाला खर्च वजा जाता सुमारे 12 लाख 85 हजारा चा नफा टोमॅटो पिकामध्ये मिळाला व त्यातून त्यांनी इतर शेतकरी बंधून पुढे आदर्श निर्माण केला आहे.