भिगवण पोलिसांची दमदार कामगिरी ; काही तासात खुनाचा लावला छडा
आरोपींना ठोकल्या बेड्या
इंदापूर : प्रतिनिधी
भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे भादलवाडी गावच्या हद्दीत नीरा भीमा नदी जोड प्रकल्प येथील डम्पिंग यार्डमध्ये दगडांच्या ढिगाऱ्यावर अतिशय निर्घृणपणे गळा चिरलेल्या अवस्थेत एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह मंगळवारी (दि.२४) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आढळला होता. भिगवण पोलिसांनी कसोशीने मयताची ओळख पटवली. यानंतर भिगवण पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ नितीन दत्तात्रय चव्हाण यांनी तक्रार दिली होती. याचा भिगवण पोलिसांनी अवघ्या २४ तासात छडा लावला असून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
भिगवण पोलिसांनी सदरचा गुन्हा निष्पन्न करण्यासाठी तीन पथके तैनात करून तातडीने पाऊले उचलून तपासामध्ये गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मयताच्या पत्नीचे तिच्या गावातील घराच्या शेजारी राहणाऱ्या अनिकेत उर्फ बबलू विकास शिंदे ( वय २१ ) रा.अकोले ता.इंदापूर याच्या सोबत पूर्वी पासून प्रेम संबध असल्याच्या माहिती वरून त्याची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीच्या उत्तरे दिली.त्यावेळी पोलिसी खाक्या दाखविताच अनिकेत उर्फ बबलू विकास शिंदे याने प्रियसीला भेटता येत नसल्याने प्रियसीचा पती महेश दत्तात्रय चव्हाण याचा मनात राग असल्याकारणाने चुलत भाऊ गणेश हनुमंत शिंदे याच्या मदतीने खून केला असल्याची कबुली दिली.
तसेच मयत महेश चव्हाण याच्या सांगण्यावरून गणेश शिंदे याच्या पत्नीने घटस्फोट घेतल्याचा संशय असल्याच्या रागातून कट रचून सोमवारी ( दि.२३ ) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अकोले येथून गप्पा मारण्याच्या बहाण्याने निरा भीमा नदी जोड प्रकल्पाच्या बोगद्या जवळील डंपिंग यार्ड येथे नेवून धारदार शस्त्राने गळा कापून खून केल्याचे पोलिसांनी उघड केले आहे.याबाबत अनिकेत उर्फ बबलू विकास शिंदे ( वय २१ ) आणि गणेश हनुमंत शिंदे ( वय २८ ) दोघे रा.अकोले यांना भिगवण पोलिसांनी अटक केली आहे.
सदरील कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष रुपनवर, पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील, पोलीस अंमलदार नाना वीर,विठ्ठल वारगड, समीर करे, सचिन पवार, महेश उगले, केशव चौधर, महेश माने, संदीप पवार, विजय लोढी, अंतुं पठाण,श्री पालसांडे,श्री भांडवलकर,अंकुश माने तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभिजित एकशिंगे,अनिल काळे,रविराज काकरे यांनी समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणला आहे.