भाजपा शिक्षक आघाडीचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी इंदापूरमध्ये आंदोलन
शिक्षणाधिकार्यांकडे दिले मागण्यांच्या संदर्भातील निवेदन

भाजपा शिक्षक आघाडीचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी इंदापूरमध्ये आंदोलन
शिक्षणाधिकार्यांकडे दिले मागण्यांच्या संदर्भातील निवेदन
इंदापूर : प्रतिनिधी
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या शिक्षक आघाडीकडून बुधवारी ( दि.८ ) इंदापूर येथील बाबा चौक ते पंचायत समिती पर्यंत विविध घोषणा देत आंदोलन करण्यात आले.यावेळी शिक्षक संघटनेला पाठिंबा दर्शवित नगरसेवक कैलास कदम यांनी शिक्षकांच्या मागण्यांची शासनाने त्वरित दखल घ्यावी अशी मागणी केली.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी,वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाच्या तारखा तात्काळ घोषित कराव्यात,१ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशतः अनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बंद केलेले भविष्य निर्वाह निधीचे खाते तात्काळ सुरू करावे,एक तारखेला वेतन मिळण्याबाबत व वेतनास विलंब करणाऱ्या संबधीत अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम व वैद्यकीय प्रतिपूर्तीची रक्कम त्वरित देय करावी, परिविक्षाधीन सहाय्यक शिक्षक ( शिक्षक सेवक ) परिविक्षाधीन शिक्षकेतर कर्मचारी ( शिक्षकेतर सेवक ) यांचे मानधन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वाढवावे,शिक्षक भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्रिस्तरीय १०,२०,३० आश्वासित प्रगती योजना तात्काळ लागू करावी.
तसेच घोषित,अघोषित व मूल्यांकन पात्र तुकड्या,शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्याची प्रत्यक्ष कार्यवाही करावी, रात्र शाळेतील कर्मचाऱ्यांना १७ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार पूर्णकालीन कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व प्रकारचे लाभ मिळावेत,इतर स्थानिक विषय व विद्यार्थ्यांचे लसीकरण करून नियमित शाळा सुरू कराव्यात अशा विविध मागण्या करण्यात आल्या असून यासंदर्भातील निवेदन इंदापूर तालुका शिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांकडे देण्यात आले.
यावेळी शंकर हुबाले, अंबादास कांबळे, रमेश कुलकर्णी, संतराम ढावरे, अण्णासाहेब खटके, रघुनाथ पन्हाळकर, अर्जुन भोंग, दादा चौधरी, शंकर गुळीक, संतोष यमगर, शशिकांत गायकवाड, यशवंत केवारे, बाळासाहेब गटकुळ व इतर शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते.