पुणे वन विभागाची वाघाची व बिबट्याची कातडी तस्करी प्रकरणी मोठी कारवाई
हॅलो फॉरेस्ट 1926 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

पुणे वन विभागाची वाघाची व बिबट्याची कातडी तस्करी प्रकरणी मोठी कारवाई
हॅलो फॉरेस्ट 1926 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन
पुणे, क्राईम;बारामती वार्तापत्र
वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो मुंबई यांचेकडून 14 सप्टेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी भांबुर्डा व वन कर्मचारी यांनी सापळा रचून वारजे येथे 3 आरोपी आणि 15 सप्टेंबर रोजी सकाळी मौजे सासवड बसस्टॅड येथे बिबट्याची कातडी आणि वाघाची कातडी विक्री करणाऱ्या 5 आरोपींना रंगेहाथ पकडल्याची माहिती उपवनसंरक्षक कार्यालयाच्या प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
अनिकेत प्रमोद भोईटे (20), संदिप शंकर लकडे (34), धनाजी नारायण काळे (35), असे एका बिबट्याची कातडीसह एकुण 3 आरोपी रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याकडून एका बिबट्याची कातडीसह 1 दुचाकी वाहन जप्तं करण्यात असून वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.
पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी सोबत सहायक वनसंरक्षक मयुर बोठे व आशुतोष शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, वनपाल वैभव बाबर, वनरक्षक सुरेश बलें, रामेश्वरं तेलंग्रे, महादेव चव्हाण, रईस मोमीन, परमेश्वर वाघमारे, योगेश तिकोळे, अमोल साठे, अमोल गुरव व इतर वन कर्मचारी होते.
पुणे वनविभागाला 15 सप्टेंबर रोजी सकाळी मौजे सासवड बसस्टॅंड येथे बिबट्याची कातडी आणि वाघाची कातडी विक्री करणारे अज्ञात इसम सकाळी 6 वाजता येणार असल्याचे समजले. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी भांबुर्डा व वन कर्मचारी यांनी बनावट गिऱ्हाईक बनवून अज्ञात इसमांना पकडणे कामी सापळा रचून सासवड बस स्टॅंड येथे इंगोले (47), बाळू बापू नामदास (65), आकाश आणासाहेब रायते (27), उदयसिंह शंकरराव सांवत (47), अमोत रमेश वेदपाठक (34) असे एकुण 5 आरोपी रंगेहाथ पकडले असुन त्यांचेकडून एक बिबट्याची कातडी आणि एक वाघाची कातडी मिळून आली. तसेच अनुक्रमे 1 इंडिका व्हिस्टा, 1 टाटा कंपनीची टिगो चार चाकी असे एकूण दोन चार चाकी जप्तं करण्यात आली. प्रस्तुत प्रकरणात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार गुन्हयाची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप संकपाळ व उपवनसंरक्षक व सहा वनसंरक्षक यांचे मार्गदर्शनाखाली करत आहेत.
आपले परिसरात कोणत्याही वन्यजीवांची तस्करी अथवा शिकार होत असल्यास त्याबाबतची माहिती वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ देण्यात यावी. हॅलो फॉरेस्ट 1926 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केले आहे.