शरद पवार यांचे जिवलग मित्र ज.मा. मोरे काळाच्या पडद्याआड
वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शरद पवार यांचे जिवलग मित्र ज.मा. मोरे काळाच्या पडद्याआड
वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
इंदापूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अत्यंत जिवलग सहकारी मित्र जगन्नाथराव मारुतीराव मोरे उर्फ ज.मा.मोरे यांनी बुधवारी ( दि.६ ) सकाळी सहा वाजता पुणे येथील खासगी रुग्णालयात वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या पश्चात भारत आणि संजय अशी दोन मुले व सुन कल्पना भारत मोरे या माजी ग्रामपंचायत सदस्या आणि समीर,रवी ही नातवंडे असा परिवार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जमा आप्पांशी गेली ४६ वर्षे मैत्रीचे संबंध होते. जमा आप्पांनी पवार यांच्या सहवासात असताना घडलेले काही प्रसंग आणि अनुभव ‘गुंफियले मोती मैत्रीचे’ या पुस्तकातून अधोरेखित केले आहेत.
जमा मोरे यांनी तीन वेळा विधानसभा निवडणुक लढवली होती.ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते.तसेच इंदापूर पंचायत समितीच्या सुरुवातीलाच दहा वर्ष सभापतीपदी म्हणून (१ मे १९६२ ते ५ ऑगस्ट १९७२) कार्यरत होते.
शरद पवारांसह आजी-माजी मंत्र्यांनी केले दुःख व्यक्त
इंदापूर तालुक्यातील माझे धडाडीचे निष्ठावंत सहकारी ज.मा मोरे यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे. जमांच्या शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.असे ट्विट करत शरद पवार यांनी ज.मा मोरे यांना श्रद्धांजली अर्पित केली.तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून देशाचे नेते आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे जवळचे स्नेही मित्र व माझे मार्गदर्शक आदरणीय जगन्नाथ (आप्पा) मोरे यांच्या निधनाची बातमी मनाला फार चटका लावणारी असून, आज माझ्या आयुष्यातील एक पितृतुल्य आदर्श मार्गदर्शकाला मुकलो.आदरणीय मोरे आप्पांच्या निधनामुळे मोरे परिवारावर कोसळलेल्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर मोरे कुटुंबास या दु:खातून सावरण्याची शक्ति देओ, ही ईश्वर चरणी प्रार्थना, अशी आदरांजली अर्पण केली. तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही ज.मा. मोरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.