माळेगाव साखर कारखान्याचा 65 व्या गळीत हंगामास सुरुवात
अजितदादांनी साखरेचा दर कारखान्यांची स्थितीवर केलं भाष्य
माळेगाव साखर कारखान्याचा 65 व्या गळीत हंगामास सुरुवात
अजितदादांनी साखरेचा दर कारखान्यांची स्थितीवर केलं भाष्य
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु करण्यात आला. अजित पवारांनी यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं अजित पवारांनी साखरेचा दर, सहकार, कारखान्यांची स्थिती, पूरस्थिती पाण्याचा प्रश्न यावर भाष्य केलं.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं अजित पवारांनी साखरेचा दर, सहकार, कारखान्यांची स्थिती, पूरस्थिती पाण्याचा प्रश्न यावर भाष्य केलं. अजित पवारांनी यावेळी मागच्या सरकारनं 5 टीएमसी पाणी दुसरीकडं वळवलं, त्यामुळं आपली वाट लागली असती,असं म्हटलं. आमचं सरकार आल्यावर निर्णय बदलला, असं अजित पवार म्हणाले. यानिमित्तानं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळातील निर्णयावर टीका केली. रसापासून इथेनॉल बनवण्याचा पर्याय किंवा अन्य पर्याय निवडूयात. सभासदांना अधिक पैसे मिळतील यावर भर द्यावा लागेल. यंदा साखरेचं उच्चांकी उत्पादन होण्याची शक्यता आहे. अनेक कारखान्यांनी आपली क्षमता वाढवलीय. जायकवाडी धरण भरलंय, उजनी 109 % भरलंय. मी रोज धरणांची स्थिती काय याची माहिती घेत असतो. सगळी धरणं भरलेली आहेत, आता फक्त तुम्ही नीट शेती करा. नायतर ह्याचं काय अन त्याचं काय, अन मळ तंबाखू, सगळे दिवस सारखे नसतात. शेतीकडे नीट लक्ष द्या, असं अजित पवार म्हणाले.
सरकार नसलं तरी चिकाटी सोडायची नसते
अजित पवारांनी बऱ्याच वर्षांनी माळेगाव कारखान्याच्या गळीत हंगामाला आलो असल्याचं म्हटलं. यावेळी त्यांनी विजयादशमी, दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. 2 नोव्हेंबर रोजी बारामतीत मुख्यमंत्री, शरद पवार आणि देशातील महत्वाचे लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. चढउतार येत असतात, सरकार नसलं तरी चिकाटी सोडायची नसते. सरकार असलं तर जमिनीवर पाय ठेवून चालायच ही आमची भूमिका आहे. अडचणी येतात, संकटं येतात अतिवृष्टी, पूर आला परवा 10 हजार कोटींचे पॅकेज दिलं. जेवढं नुकसान झालं त्याची भरपाई देता येत नाही याची खंत आहे. केंद्र सरकारची मदत मिळत नाही, असं देखील अजित पवार म्हणाले.
आज माळेगावला आल्यावर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. सोमेश्वरच्या 90% सभासदांनी साथ दिली. सोमेश्वरच्या 152 गावातल्या सभासदांचे आभार मानतो. मी म्हणालो होतो मतांचं ओझं टाका. त्यांनीही इतकं ओझं टाकलं की मी पार आडवाच व्हायची वेळ आलीय. 90 पासून राजकारणात आहे. एवढी एकतर्फी निवडणूक पाहिली नाही. हे फक्त सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात होवू शकतं. 4 कोटी 80 लाख रुपये किमतीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन प्रकल्पाची माळेगाव कारखान्याने उभारणी केली.सभासद हे कारखान्याचे मालक असतात. नविन मुलं शिकलीत त्यांची मदत घ्या. उसाला चांगला दर, कामगारांना योग्य पगार, तोडणी कामगारांना योग्य दर मिळत असताना कोणाला त्रास होण्याचं कारण नाही.
जोपर्यंत तुमचा पाठींबा
राष्ट्रवादीकडे माळेगावची सुत्रे येण्यापूर्वी प्रचंड नुकसान झालं होतं. अनेक ठिकाणी गळती झाली होती. मला जोपर्यंत तुमचा पाठिंबा आहे तोवर मी कशातही कमी पडणार नाही. विरोधकांच्या ताब्यात असताना माळेगाव कारखान्यात सतत बिघाड होत होते. साखरेचं उत्पादन खराब झालेलं होतं.
चेअरमन व्हायचं म्हणून काहीजण…
माळेगाव साखर कारखान्याबद्दल मध्यंतरी मी म्हणालो माळेगावला तावरे सोडून इतरांना संधी देणार आहे. मात्र, पण हे साहेब जेव्हा थांबा म्हणतील तेव्हा, असं अजित पवार म्हणाले. चेअरमन व्हायचं म्हणून काहीजण लगेच देवदर्शनाला गेले. पण बाळासाहेब तावरे काम करतायत तोवर करु द्या त्यांना असं अजित पवार म्हणाले. आम्ही दिलेल्या शब्दाचे पक्के आहोत जे काम करायचं ते पक्कंचं करणार आहे. यंदाचा गळीत हंगाम चांगला होईल. सभासदांनी पत्र दिलं, गेटकेन ऊस नको, आमचं पॅनल आलं की गेटकेन नको आणि विरोधकांची सत्ता असली की घाल गेटकेन, असं सुरु असल्याचं अजित पवार म्हणाले.