सर्व समाजघटकांच्या प्रगतीसाठी दर्जेदार विकासकामे करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

जामखेड तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन

सर्व समाजघटकांच्या प्रगतीसाठी दर्जेदार विकासकामे करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

जामखेड तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन

प्रतिनिधी

सर्व समाजघटकांचा विचार करत शासन काम करत आहे. शेतकरी हिताचे अनेक निर्णय राज्याने घेतले आहेत. कोरोना व इतर अनेक नैसर्गिक संकटातही राज्यातील सर्व जिल्ह्यांना शासनाने जिल्हा नियोजनात शंभर टक्के निधी उपलब्ध करून दिला आहे. निधीचा योग्य विनियोग करून दर्जेदार विकासकामे करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले.

जामखेड शहर व तालुक्यातील विविध विकासकामांचे एकत्रित भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, आमदार सर्वश्री रोहित पवार, लहू कानडे, निलेश लंके, संग्राम जगताप उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, राज्यात केंद्र व राज्याच्या माध्यमातून रस्ते विकासाची अनेक कामे सुरू करण्यात आली आहेत. आमदार निधी 4 कोटी करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीस शंभर टक्के निधी देण्यात आला आहे. शेतकरी कर्जमाफी, नैसर्गिक संकटात आपत्तीग्रस्तांना मदत,कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी भरघोस निधींच्या माध्यमातून राज्याने काम केले. शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला. जनतेनेही शासनाला पाठबळ देण्याची गरज आहे. थकित वीज बीले भरली पाहिजेत, पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे.

कोरोना संकटातून राज्य सावरत आहे. 10 कोटींपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र पुन्हा तिसरी लाट येऊ नये. यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळत कोरोना नियमावलीचे नियमितपणे पालन केले पाहिजे. असे आवाहनही श्री.पवार यांनी यावेळी केले.

त्रिपुरामधील घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, काही समाजकंटक समाजात तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. अशा लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका. राज्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर जातीपातीच्या विचार न करता समाजाचा, माणुसकीचा विचार करा.

श्री.पवार म्हणाले, उसाला जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी शासन साखर कारखानादारांशी चर्चा करत आहे. शेती उत्पादनाला चांगला भाव मिळण्यासाठी मार्केट कमिट्या मजबूत झाल्या पाहिजेत.

एस.टी. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मात्र प्रवाशी हिताचा पण विचार झाला पाहिजे. असेही श्री.पवार यांनी सांगितले.

खर्डा परिसरातील संत सिताराम गड, संत गीतेबाबा, शिवपट्टण किल्ला, निंबाळकर वाडा, बारा ज्योतिर्लिंग या स्थळांचा पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहितीही श्री.पवार यांनी यावेळी दिली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.अशोक चव्हाण म्हणाले, कोरोना संकटात राज्याची आरोग्य सेवा बळकट करण्याचं काम शासनातर्फे करण्यात आले आहे. मागील दोन वर्षांत कर्जत-जामखेड मध्ये 98 कामांच्या माध्यमातून 637 कोटींची कामे मंजूर करण्यात आली. रस्ते कामासोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्यात आला.

कार्यक्रमापूर्वी चौंडी येथिल राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार व उपस्थितांनी अभिवादन केले.

जामखेड शासकीय विश्रामगृह विस्तारीकरण, पंचायत समिती दुस-या मजल्याचे बांधकाम, अधिकारी-कर्मचा-यांच्या शासकीय निवासस्थानाचे बांधकाम, शहरांतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता , नगरपरिषद प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, नाना-नानी उद्यान, सामाजिक सभागृह, व्यापारी संकुल, मुस्लिम दफनभूमी बांधकाम व सुशोभीकरण अर्थसंकल्प व विशेष दुरुस्ती कार्यक्रम अंतर्गत मंजूर 120 कि.मी लांबीचा रस्ता, 140 कोटींच्या पाणी पुरवठा योजना व जामखेड शहरातील विविध कामांचा लोकार्पण सोहळा यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी जामखेड येथे कोरोना काळात उत्कृष्ट आरोग्य सेवा देणारे डॉ.रवी व शोभा आरोळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram