तोडगा निघाला ! हर्षवर्धन पाटील यांचे धरणे आंदोलन मागे
शेतकऱ्यांनी केलं समाधान व्यक्त
इंदापूर : प्रतिनिधी
थकीत वीज बिलामुळे शेतकऱ्यांचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला होता.त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर महावितरण कार्यालयासमोर शनिवार पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते.त्यावर रविवारी (दि.२८) अखेर तोडगा निघाला आहे.
शनिवारी महावितरण अधिकारी आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये झालेली चर्चा फिस्कटल्याने आंदोलनाला वेगळंच वळण लागले होते.सर्व आंदोलनकर्त्यांनी महावितरणच्या सबस्टेशन परिसरात रात्रभर ठिय्या मांडून लोकप्रतिनिधी व राज्यसरकार विरोधात घोषणाबाजी केली होती.परंतु रविवारी (दि.२८) दुपारी अधीक्षक अभियंता श्री.पाटील,कार्यकारी अभियंता श्री.लटपटे,श्री.सुळ, तहसीलदार श्रीकांत पाटील,उपअभियंता रघुनाथ गोफणे,पोलीस निरीक्षक तयूब मुजावर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन यासंदर्भात चर्चा केली.त्यामुळे अखेर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, विद्युत वितरण च्या अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. चर्चेमधून प्रति हॉर्स पॉवरसाठी पाचशे रुपये प्रमाणे बिल भरून खंडीत वीजपुरवठा तात्काळ जोडला जाणार असा तोडगा निघाला आहे.वीज बिलांमध्ये ज्या काही चुका झाल्या आहेत त्यामध्ये दुरुस्ती करण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे.त्याच बरोबर डीपी जळाला तर ७० ते ८० टक्के रक्कम भरावी लागत होती त्यामध्ये सवलत देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
तसेच विद्युत तारा जुन्या झाल्याकारणाने त्या तुटतात, त्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होते त्यामुळं त्या तारा दुरुस्त करण्याचे ही या चर्चेत मान्य करण्यात आले आहे.त्याच बरोबर प्राथमिक शाळांचा खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे देखील या चर्चेमध्ये मान्य करण्यात आले असल्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे,भाजपा तालुकाध्यक्ष शरद जामदार,विलासराव वाघमोडे,शहराध्यक्ष शकील सय्यद,पांडुरंग शिंदे,निरा भीमा कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार,गजानन वाकसे,बापूसाहेब जामदार व इतर आंदोलनकर्ते शेतकरी उपस्थित होते.
प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी सर्व महावितरण अधिकाऱ्यांचे पोलीस प्रशासनाचे तसेच उपस्थित सर्व शेतकऱ्यांचे आभार मानून धरणे आंदोलनामुळे विविध विषयांसंदर्भात चर्चेअंती तोडगा निघाल्याने समाधान व्यक्त केले.