राज्य सरकारकडून शाळा सुरु करण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं नियमावली एका क्लिकवर
मार्च 2020 पासून बंद असणारे पहिलीपासूनचे वर्ग सुरु होत आहेत.
राज्य सरकारकडून शाळा सुरु करण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं नियमावली एका क्लिकवर
मार्च 2020 पासून बंद असणारे पहिलीपासूनचे वर्ग सुरु होत आहेत.
प्रतिनिधी
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून शाळा सुरु करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी केला होता. शाळा सुरु करण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं नियमावली आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शाळा सुरु करताना त्या नियमांचं पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेली नियमावली
♦ शाळा सुरु करण्यापूर्वी संबंधित शहरात/ गावात सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करुन 100% लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
♦ विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये. कोविडसंबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
♦ जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये घ्यावी
♦ एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15-20 विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठविणे या गोष्टींचे पालन करावे
♦ विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तत्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी, विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत. तसेच कोविडग्रस्त विद्यार्थ्यांच्या शेजारील विद्यार्थ्यांचीसुद्धा कोरोना चाचणी करुन घ्यावी.
♦ शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदला बदलीच्या दिवशी सकाळी दुपारी ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य द्यावे. यासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचनाचे (SOP) पालन करावे. संबंधीत शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात किंवा गावात करावी.
♦ सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी. वरील सर्व बाबींचे शहरी भागात महानगरपालीका आयुक्त व इतर भागात जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / मुख्याधिकारी, नगरपरिषद यांनी शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या समवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे संबंधितांना सूचना कराव्यात.
♦ ग्रामीण भागातील इयत्ता 1 ली ते 4 थी व महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 1 ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांचे शाळेतील वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांनी स्वागत करुन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा.
♦ शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे. भेटीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा. विभागीय उपसंचालकांनी एकत्रित अहवाल शिक्षण संचालकांना सादर करावा. वरील मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक्त शासनाने कोविड-19 संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचेदेखील पालन करण्यात यावे.