बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या सात जणांना अटक
संशयीत आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या सात जणांना अटक
संशयीत आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
प्रतिनिधी
बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणारी घटना नुकतीच घडली आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. दरम्यान, या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी सात जणांना अटक केली असून या संशयीत आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणारे हे विकृत समाजकंठक कर्नाटकातील रणधीर सेनेशी संबंधित असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांनी लाल पिवळा झेंडा जाळला म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर शाई ओतल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या संशयितांनी पोलीस चौकशीवेळी दिली आहे.
सदाशिव नगर पोलीस याबाबत अधिक चौकशी करत आहेत. अशी माहिती बंगळुरू सेंट्रल विभागाचे डी. सी. पी. अनुचेत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शनिवारी संध्याकाळी पाच जणांना अटक केली असून रविवारी सकाळी दोघांना अटक केली आहे. त्यांनी वापरलेली वाहने आणि साहित्य पोलिसांनी जप्त केले आहेत. अन्य काही जण फरारी असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. अशी माहिती अनुचेत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान, या घटनेवरून संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी धक्कादायक वक्तव्य केलंय. पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट आहे, असं वक्तव्य बोम्मई यांनी केल्यानं आता शिवप्रेमी अधिकच संपातले आहेत. खरंतर संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान असणाऱ्या शिवाजी राजांच्या पुतळ्याची विटंबना करणार्यांवर त्वरित कारवाई करण्याऐवजी ही गोष्ट छोटी असल्याचे सांगत त्यांनी शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळलंय. त्यामुळं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त केला जातो आहे.