कर्मयोगीचे ३ लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण ; उपपदार्थ निर्मिती करणारे प्रकल्प पुर्ण क्षमतेने चालु
कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली माहिती
कर्मयोगीचे ३ लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण ; उपपदार्थ निर्मिती करणारे प्रकल्प पुर्ण क्षमतेने चालु
कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली माहिती
इंदापूर : प्रतिनिधी
महात्मा फुलेनगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने सन २०२१-२२ च्या गळीत हंगामामध्ये मंगळवार (दि.२१) अखेर ३ लाख २१ हजार मे. टन ऊसाचे गाळप पुर्ण केले आहे. अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्ष भरत शहा यांनी दिली.
कर्मयोगी कारखान्याचा चालू गळीत हंगाम प्रगतीपथावर असून दररोज प्रतिदिनी सरासरी ९ हजार मे. टना हुन अधिक क्षमतेने ऊसाचे गाळप केले जात आहे. कारखान्याने ऊस गाळपाचा ३ लाख मे. टनाचा महत्वाचा टप्पा पार केलेबद्दल संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूक कंत्राटदार, मुकादम, तोडणी मजूर, अधिकारी, कर्मचारी व हितचिंतक यांचे हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
कर्मयोगीचा सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प आदी उपपदार्थ निर्मिती करणारे प्रकल्प सध्या पुर्ण क्षमतेने चालु आहेत. कारखान्याने चालू हंगामात गाळप होणाऱ्या ऊसास प्रति टन रु. २५०० पेक्षा अधिकचा दर जाहीर केला असून शेतकऱ्यांना पहिला हप्ता प्रति टन रु. २१०० प्रमाणे नियमितपणे अदा केला जात आहे. कारखान्याच्या सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पातून उत्पादित सेंद्रिय खतांच्या बॅगची विक्री सुरु आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी गाळपास आलेल्या ऊसावर उधारीने सेंद्रिय खत दिले जात आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील व भरत शहा यांनी दिली.
कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी नुकतेच कारखाना कार्यक्षेत्रात ऊस उत्पादकांशी गटनिहाय बैठका घेऊन संवाद साधला. या संवाद बैठकांचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसत असून, कर्मयोगी कारखान्याकडे ऊस देणेसाठी शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी वर्ग चांगले काम करीत असून, संचालक मंडळ हे अधिकचे ऊस गाळप व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, छगन भोंगळे, प्रदीप पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर, केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरा पारेकर, वसंत मोहोळकर, शारदा पवार, कांचन कदम, कार्यकारी संचालक देवराव लोकरे व अधिकारी उपस्थित होते.