राज्यमंत्री भरणेंकडून इंदापूर नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड
शंभर कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपाची केली मदत

राज्यमंत्री भरणेंकडून इंदापूर नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड
शंभर कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपाची केली मदत
इंदापूर : प्रतिनिधी
कोरोना काळात स्वतःची व आपल्या परिवाराची कसलीही पर्वा न करता शहराच्या सेवार्थ उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या इंदापूर नगरपरिषदेच्या शंभर सफाई कर्मचाऱ्यांना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दोन लाख रुपये रोख स्वरूपाची भेट देत त्यांची संक्रात गोड केली.
इंदापूर नगरपरिषदेच्या प्रांगणात सोमवारी (दि.१०) मुख्याधिकारी रामराजे कापरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी सर्व सफाई कामगारांना रोख स्वरूपात भेट देण्यात आली.त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर काही प्रमाणात आनंद पहावयास मिळाला.
प्रसंगी बोलताना बाळासाहेब ढवळे म्हणाले की, ज्या सफाई कर्मचाऱ्यांमुळे इंदापूर नगरपरिषदेचे नाव महाराष्ट्रासह देशभरात उंचावले अशा इंदापूर नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड व्हावी या भावनेतून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रोख स्वरूपाची भेट दिली. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या माध्यमातून शहराचा कायापालट होत असल्याने त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. तसेच कोविड काळात नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता शहराची सेवा केली त्याबद्दल त्यांचं ही आभार व्यक्त करतो.
पत्रकार दिनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सफाई कर्मचाऱ्यांना मदत करण्याचे घोषित केले होते. तो शब्द ‘मामांनी’ खरा करून दाखवला. मामा फक्त बोलतच नाहीत तर ते प्रत्यक्षात कृती करून दाखवतात. कोरोना काळात सफाई कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची तमा न बाळगता जनतेचे आरोग्य अबाधित राखण्याचे काम केले आहे. त्यामुळे मामांनी केलेला सन्मान हा खरोखरच वाखाणण्याजोगा आहे असे प्रतिपादन नगरसेविका राजश्री मखरे यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,इंदापूर नगरपरिषदेचे विरोधीपक्ष नेते पोपट शिंदे,नगरसेविका राजश्री मखरे,नगरसेवक अमर गाडे,अनिकेत वाघ,स्वप्नील राऊत,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपसरचिटणीस अनिल राऊत,माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस,वसंत मालुंजकर,वसीम बागवान व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभा अधीक्षक गजानन पुंडे यांनी केले.दरम्यान नगरपरिषदेचे कर्मचारी विजय भोसले यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.