महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या पाठीशी : ना.दत्तात्रय भरणे
नगरपंचायत निवडणुकीच्या निकालावरून केलं समाधान व्यक्त

महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या पाठीशी : ना.दत्तात्रय भरणे
नगरपंचायत निवडणुकीच्या निकालावरून केलं समाधान व्यक्त
इंदापूर : प्रतिनिधी
राज्यातील नगरपंचायतींच्या निवडणुकांचे चित्र बुधवारी स्पष्ट झाले.पार पडलेल्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त नगरपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या असून महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्ष आणि महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी बुधवारी (दि.१९) पार पडली,यामध्ये सर्वांत जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या. महाराष्ट्रातील ग्रामीण भागासह निमशहरी भागावरही ख-या अर्थाने राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे,त्यामुळे तीन जिल्ह्यापुरता मर्यादित पक्ष अशी टीका करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनतेने चपराक दिली असल्याचे सांगत ना.भरणे यांनी भाजपला टोला मारला.
नगरपंचायतीच्या निकालावर भाष्य करताना ना.भरणे म्हणाले की,राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताला प्राधान्य देण्याचे काम करत आहे,आम्ही सर्वजण सत्तेचा वापर जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे करत आहोत.त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाविषयी महाराष्ट्रातील जनतेमध्ये एक प्रकारचा विश्वास असल्याचे पुन्हा एकदा आजच्या निकालावरून अधोरेखित झाले आहे.या निकालातून दिलेला कौल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस अजून मजबूत होताना दिसत असून आमची जबाबदारी निश्चितपणे वाढली आहे,त्यामुळे पक्षश्रेष्ठी शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक चांगले काम करून महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास सार्थ ठरवू भविष्यात येणाऱ्या सर्व निवडणुकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच प्रथम क्रमांकावर राहणार असल्याचे सांगून नगरपंचायत निवडणुकांमध्ये जिंकून आलेल्या राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या सर्व विजयी उमेदवारांचे त्यांनी अभिनंदन केले.