शॉपिंग सेंटर ई-लिलाव प्रक्रियेच्या संदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षा शहा यांची घेतली भेट
ई-लिलाव प्रक्रियेतील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा

शॉपिंग सेंटर ई-लिलाव प्रक्रियेच्या संदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षा शहा यांची घेतली भेट
ई-लिलाव प्रक्रियेतील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा
इंदापूर : प्रतिनिधी
बुधवारी (दि.१९) काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षा अंकिता शहा यांची भेट घेतली. काँग्रेसने केलेल्या मागणीचा विचार करत दर गाळ्याच्या बोलीला २० हजार रुपये डिपॉझिटची मागणी रद्द करून ३० हजार रुपये भरून अनेक गळ्यांसाठी बोली बोलण्याची अनुमती देण्यात आली असून शंभर फुटी रोड वरील सर्व अतिक्रमणाची जबाबदारी घेत अतिक्रमण काढलेले आहे.
काँग्रेसने केलेल्या प्रमुख मागण्यांपैकी दर महा असणारे भाडे कमी करण्याच्या मागणीसंदर्भात ताबडतोब प्रांतधिकारी आणि टाऊन प्लॅनिंग कडे पत्र व्यवहार करू असे आश्वासन नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी यावेळी दिले.सदरील बैठकीत अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर अर्ज भरण्याची मुदत वाढ देण्याच्या संदर्भात उद्या निर्णय घेऊ असे नगरसेवक भरत शहा यांनी सांगितले होते.त्यानुसार गुरुवारी (दि.२०) यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून लिलावमध्ये सहभागी होण्याकरिता २७ जानेवारी पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे.
इंदापूर शहरात नव्याने सुरु होत असलेल्या छत्रपती संभाजी राजे शॉपिंग सेंटर मधील गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेवर आक्षेप घेत काँग्रेस पक्षाने विविध मागण्यांसाठी निवेदन दिले होते. त्यात प्रामुख्याने भाडे कमी करणे, घरपट्टी गाळेधारकाने न भरता नगरपालिकेने भरणे, कराराची वर्षे वाढवणे, स्थानिकांना प्राधान्य देणे, दर गाळ्याच्या बोलीसाठीची २० हजाराची अट आहे ती शिथिल करणे व गाळ्यासमोर अतिक्रमण होणार नाही याची हमी नगरपालिकेने देणे इत्यादी मागण्यासाठी काँग्रेस अग्रेसर होती.
यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्यासह इंदापूर शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष चमनभाई बागवान, जिल्हा सरचिटणीस जकिर काजी, सचिव महादेव लोंढे, खजिनदार भगवान पासगे इत्यादी उपस्थित होते.