एकशे वीस वर्षात यंदा सर्वाधिक ऊस क्षेत्र : सा.आयुक्त शेखर गायकवाड
एका वर्षात एक लाख हेक्टर क्षेत्र वाढल्याची दिली माहिती
एकशे वीस वर्षात यंदा सर्वाधिक ऊस क्षेत्र : सा.आयुक्त शेखर गायकवाड
एका वर्षात एक लाख हेक्टर क्षेत्र वाढल्याची दिली माहिती
इंदापूर : प्रतिनिधी
नैसर्गिक आपत्तींमुळे कांदा,द्राक्ष,डाळिंब, सोयाबीन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी परत ऊस शेतीकडे वळू लागला आहे.साखर कारखानदारी सुरू झाल्यापासूनच्या गेल्या एकशे वीस वर्षात यंदा सर्वाधिक ऊस क्षेत्र आहे. एका वर्षात एक लाख हेक्टर क्षेत्र वाढणे म्हणजे फार मोठा बदल आहे अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.ते कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना बिजवडी या ठिकाणी पत्रकारांशी बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहणार नाही हे बघणं मोठी जबाबदारी आहे. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर परभणी पर्यंत जास्त ऊस आहे. त्यामुळे हा ऊस इतर सर्व कारखान्यांना वाटप करून देणे आणि त्याच वेळेत गाळप करणे आव्हान आहे.कारखान्यांनी शेअर्सचे भांडवल वाढवणं महत्वाचं आहे. त्यामुळे सभासदांनी हे लक्षात घेतले पाहिजे की,कारखान्याची ताकद वाढल्याशिवाय कारखाने टिकणार नाहीत.मागील वर्षी शंभर कोटी लिटर पर्यंत इथेनॉल निर्मिती झाली.यावर्षी दीडशे कोटी लिटर पर्यंत पोहोचेल. त्यामुळे साधारणतः १० हजार कोटींची उलाढाल होईल. यापुढे साखर कमी आणि इथेनॉल जास्त असं जर करत जाऊ तर साखरेचे ही बाजार वाढतील आणि इथेनॉलला पण खात्रीशीर दर मिळेल.
दर २१ दिवसांनी इथेनॉलचे पैसे साखर कारखान्यांना मिळत असल्याने त्यांची क्रमवारी प्रसिद्ध केली. त्यावरून असे दिसत आहे की, मागील वेळी ४० कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिला होता.या वर्षी ७० कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी सोडवू शकलो तर पैसे देण्याची कारखान्यांची इच्छा आहे असा संदेश सर्वांपर्यंत गेला पाहिजे. कदाचित या वर्षी कारखाने जेव्हा बंद होतील त्यानंतर पंधरा दिवसांच्या आत महाराष्ट्रात ९५ टक्के पेक्षा जास्त एफआरपी दिलेला असेल असेल हे खूप मोठं यश असेल असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यावेळी म्हणाले.
शेतकऱ्याच्या ऊस बिलातून थकीत विज बिलाची वसुली करण्याचा राज्य शासनाचा निर्णय चुकीचा असून अशाप्रकारे वीज बिलाची वसुली करणे हे बेकायदेशीर व अन्यायकारक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊस बिला मधून होणारी थकीत बिलाची वसुली करू नये या प्रमुख मागणीसह इतर मागण्या राज्याचे माजी सहकारमंत्री व कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांकडे केल्या.