इंदापूर नगरपरिषदेने चौफेर विकास करत शहराचा चेहरामोहरा बदलला – हर्षवर्धन पाटील
नगरपरिषदेच्या नूतन इमारतीसह विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न
इंदापूर नगरपरिषदेने चौफेर विकास करत शहराचा चेहरामोहरा बदलला – हर्षवर्धन पाटील
नगरपरिषदेच्या नूतन इमारतीसह विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर नगरपरिषदेने प्रतिकुल परिस्थितीमध्ये धैर्याने, एकजुटीने चौफेर विकास करीत शहराचा चेहरामोहरा बदलत विकासाचे आदर्शवत माॅडेल म्हणून नगरपरिषद नावारूपास आली असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले.इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने शहरात करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्याचे आयोजन शनिवारी (दि.१२) करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते.
तत्पूर्वी इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगरमध्ये उभारण्यात आलेल्या भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर भवन या नूतन इमारतीचे लोकार्पण हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन भरत शहा, भारतीय बौद्ध महासभेचे इंदापूर तालुकाध्यक्ष विलास मखरे, डाॅ. सलीम मोमीन उपस्थित होते.
त्याचप्रमाणे इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष कै.धनंजय (बापू) वाशिंबेकर सृजल निर्मल पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण शहरातील जेष्ठ मार्गदर्शक प्रल्हाद राऊत व नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा धनश्री धनंजय वाशिंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे शाॅपिंग सेंटरचे उद्घाटन माजी निवासी नायब तहसीलदार विष्णुपंत बाब्रस व स्वामीराज उद्योग समुहाचे चित्तरंजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. व नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक तथा व्हा.चेअरमन गोकुळदास शहा व जेष्ठ कवयित्री प्रतिभा गारटकर यांच्या हस्ते पार पडले.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की, शहराच्या दृष्टीने आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे. सन २०१७ साली आम्हाला नगरपरिषदेत काठावरचे बहुमत मिळाले. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अंकिता मुकुंद शहा यांना जनतेने भरघोस मतदान देऊन निवडून दिले. जनतेने दिलेल्या विश्वासाला पात्र राहत नगराध्यक्षा व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी धैर्याने, एकजुटीने काम करीत पाच वर्षाचा कालावधी पूर्ण केला.सुरुवातीला विजेचा,पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व रस्त्याची कामे आदी प्रश्न प्रलंबित होते. हे प्रश्न आम्ही सोडविल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले तसेच पुन्हा एकदा शहरात विकासाची गंगा आणण्यासाठी शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकदिलाने, एकजुटीने काम करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.
नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या, घरप्रपंच सांभाळत शहराचा कारभारही पाहिला. नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात शहराच्या विकासासाठी नागरिकांचे मोठे योगदान लाभले. त्यांच्या या योगदानामुळे नगरपरिषदेचा स्वच्छ सर्वेक्षणामध्ये तब्बल चार वेळा गौरव झाला. इंदापूर शहराच्या सेवेसाठी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही अंकिता शहा यांनी शहरवासीयांना दिली.
प्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, जेष्ठ कवयित्री प्रतिभा गारटकर यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्ताफ पठाण यांनी केले तर आभार उपनगराध्यक्ष धनंजय पाटील यांनी मानले.सदर कार्यक्रमाला मुख्याधिकारी रामराजे कापरे, नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी तसेच तालुक्यातील विविध पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.