सोमेश्वर कारखान्यावरील ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी कोपीवरची शाळा उपक्रम
७० मुलांचे कोरोनाप्रतिबंधक लसीकरण केले.

सोमेश्वर कारखान्यावरील ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी कोपीवरची शाळा उपक्रम
७० मुलांचे कोरोनाप्रतिबंधक लसीकरण केले.
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्याच्या विविध जिल्हयातून ऊसतोड मजूर दरवर्षी साखर कारखान्यांवर ऊस तोडण्यासाठी येतात. सहा महिन्यांपर्यंत त्यांचे कारखान्यावर वास्तव्य असते. मजुरांच्या अनेक कुटुंबांसोबत त्यांची मुलेदेखील स्थलांतरीत होतात.
सदर मुलांपैकी बहुतांश मूले मुळ गावी असताना शाळेत असतात. परंतु स्थलातरावेळी काही मजुर मुलांना शाळेसाठी घरी आजी-आजोबा किंवा नातेवाईकांकडे ठेवतातही परंतु बहुतांश कुटुंबांना सोय नसल्याने मुलांना सोबत आणावे लागते. यानंतर सहा महिने शाळा बुडते.
याचसाठी सोमेश्वर कारखान्यावर ‘आशा’ प्रकल्प सुरू झाला होता. त्याअंतर्गत २०१६-१७ ते २०२० २१ अशी पाच वर्ष ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना शिक्षणाची सोय करून देण्यात आली होती. परंतु संबंधित संस्थेचा करार संपल्याने हे काम थांबले होते. यानंतर मजुरांच्या मुलांचे शिक्षण थांबेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
परंतु सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाने आशा प्रकल्पाच प्रकल्प प्रमुख संतोष शेंडकर यांच्याशी मुलांच्या शिक्षणाबाबत चर्चा केली आणि कारखान्याजवळ पडलेल्या सातशे-आठशे कोप्यांमधील मुलांना शिक्षण देण्याचा महत्वपूर्ण ठराव संचालक मंडळाने घेतला.
त्यानुसार क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ३ जानेवारीपासून ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी कोपीवरची शाळा हा उपक्रम सुरू केला आहे. गेले दोन-अडीच महिने हा उपक्रम सलग सुरू असून मेअखेरपर्यंत मुलांना शिक्षण दिले जाणार आहे.
सदर उपक्रम कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. उपक्रमाचे समन्वयक म्हणून संतोष शेंडकर यांनी विनामाधन दैनंदिन कामाक्रज करून घेण्याची जबाबदारी सांभाळली आहे. सात शिक्षक कार्यकर्त्यांची उपक्रमासाठी कारखान्याने तात्पुरती नियुक्ती केली आहे.
सर्वेक्षणानुसार सातशे कोप्यांपैकी ३१५ कुटुंबांमध्ये ० ते १८ वयोगटाची ४८१ मुले आढळली आहेत. त्यापैकी • ते ६ वयोगटाची ११५ तर ज्यांना शिक्षण हक्क कायदा लागू आहे अशा ६ ते १४ वयोगटाची २७७ मुले आढळली आहेत. तर १५ ते १८ वयोगटांची ८९ मुले आढळली आहेत. ६ ते १४ वयोगटातील मुलांना दररोज सायंकाळी पाच ते साडेआठ-नऊ या वेळेत कोपीवर जाऊन मुलांना गोळा करून अभ्यासवर्ग घेतला जातो. यामध्ये शालेय अभ्यास, अवांतर वाचन, लेखन वाचन, खेळ-गाणी घेतले जाते, २७७ पैकी २२७ मुलांच्या क्षमता चाचण्या घेतल्या असून क्षमतेनुसार गट करून त्यांना अध्यापन केले जात आहे.
शिक्षणासोबत १५ ते १८ वयोगटातील शिक्षणात असलेल्या मुलांनाही मार्गदर्शन केले जाते. यातील ७० मुलांचे कोरोनाप्रतिबंधक लसीकरण केले. तर ३८३ प्रौढ मजुरांचेही दोन टप्प्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले. गर्भवती व स्तनदा मातांची आरोग्य खात्याकडे नोंदणी केली तर • ते ६ वयोगटाच्या मुलांच्या याद्या अंगणवाडीस देऊन पूरक आहार प्राप्त केला आहे. शालेय मुलांना जिल्हा परिषद शाळेशी जोडून पोषण आहार प्राप्त झाला आहे.
या उपक्रमामुळे ऊसतोड मजुरांची मुले अगदी कोरोनाकाळातही कोपीवर बसून शिक्षण घेत आहेत. या मुलांचा सहा महिन्यांचा अभ्यास भरून काढला नाही तर मुले भविष्यात शिक्षणातून बाहेर पडण्याची शक्यता असते. कोपिवरची शाळा उपक्रमामुळे मुले शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहणार आहेत. स्वतः कारखान्याने जिल्हा परिषद शाळा अथवा शिक्षण विभागाच्या मदतीशिवाय संचालक मंडळाने चालविलेला हा राज्यातील पहिला उपक्रम आहे, अशी माहिती पुरुषोत्तम जगताप व राजेंद्र यादव यांनी दिली.
चौकट – – –
सहा ते चौदा वयोगटातील २७७ मुलांपैकी २२७ मुलाची क्षमता चाचणी घेण्यात आली. यामध्ये पूर्वतयारीमध्ये ४३ तर मुळाक्षरात ७६ मुले असल्याचे आढळले. ३१ मुले बाराखडी, ४१ मुले जोडाक्षर तर ३६ मुले समजपूर्वक वाचन या क्षमता धारण करतात असे दिसून आले. पहिली ते आठवीच्या वयोगटातील केवळ ३६ मुलांना समजपूर्वक वाचता येते आणि ७६ मुले अजूनही मुळाक्षरेच गिरवत आहेत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. या सर्व मुलांना समजपूर्वक वाचनापर्यंत नेण्याचा प्रयत्न अभ्यासवर्गात केला जात आहे.