अॅड. गुणरत्न सदावर्तेंची पोलीस कोठडीत आणखी दोन दिवस वाढ,सुनावणी दरम्यान अनेक खळबळजनक दावे सरकारी वकिलांनी केले
एक फोन नागपूर येथे करण्यात आला त्याचे नाव आता आम्ही कोर्टात सांगू शकत नाही

अॅड. गुणरत्न सदावर्तेंची पोलीस कोठडीत आणखी दोन दिवस वाढ,सुनावणी दरम्यान अनेक खळबळजनक दावे सरकारी वकिलांनी केले
एक फोन नागपूर येथे करण्यात आला त्याचे नाव आता आम्ही कोर्टात सांगू शकत नाही
मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.त्यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदावर्तेंना 11 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी पोलिसांनी केली होती.
मुंबई पोलिसांच्या वतीने सरकारी वकील अॅड प्रदीप घरत यांनी योरदार युक्तीवाद करत तपास प्राथमिक टप्प्यात असल्याने पोलिस कोठडी आवश्यक असल्याचं सांगत सदावर्तेंच्या विरोधात पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत. पोलिस कोठडीच्या दोन दिवसांत त्यांची चौकशी केली गेली आहे. पण दोन दिवसांचा कालावधी हा चौकशीसाठी पुरेसा नाहीय. ‘कुछ बातें हो चुकी है, कुछ बातें अभी है बाकी’, अशी परिस्थिती असल्याने सदावर्तेंना पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी केली होती. न्यायालयाने सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचे युक्तीवाद ऐकल्यानंतर सदावर्तेंना आणखी २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
काय घडलं कोर्टात?
गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत वाढ व्हावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद करताना म्हटलं, सिल्वर ओकवर हल्ल्याआधी एक बैठक झाली होती. या बैठकीत सिल्वर ओक येथे हल्ला करण्याचे ठरले होते. अभिषेक पाटील नावाचा एक एसटी कर्मचारी सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्याने फोन करुन काही पत्रकारांना बोलावले. युट्युब चॅनलचे देखील पत्रकार होते. 4 जणांचा ताबा पाहिजे आहे तसंच या प्रकरणी एक जण फरार आहे.
सिल्वर ओकवरील हल्ल्याचं नागपूर कनेक्शन
सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी पुढे म्हटलं, MJT मराठी न्यूज चॅनलचा चंद्रकांत सुर्यवंशी नावाचा पत्रकार सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्याने काही व्हिडीओ डिलीट केलेत. या पत्रकाराचे आणि सदावर्ते यांचे सकाळी 10.30 पासुन व्हॉट्सअॅप चॅटिंग आहेत. या दोघात व्हॉट्सअॅप कॉल झाले. तर एक फोन नागपूर येथे करण्यात आला त्याचे नाव आता आम्ही कोर्टात सांगू शकत नाही.
सरकारी वकिलांनी पुढे म्हटलं, काहीजण या मागे आहेत जे वेस्टेड कारणाकरता सपोर्ट करत आहेत. यांना गेली 6 महिन्यांपासून पैसे कुठून येतायेत याचा तपास करायचा आहे. 530 रुपये प्रत्येक एसटी कर्मचाऱ्यांकडून गोळा केले गेले जवळपास 1 कोटी 80 लाख रुपये जमा झाले होते. या पैशांचे इतर ही काही लाभार्थी आहेत हे तपासात समोर आले आहे.
सरकारी वकील प्रदीप घरत यांचा जोरदार युक्तीवाद
शरद पवार यांच्या घरावरील हल्ला हा पूर्वनियोजित कट होता.६ एप्रिल रोजीच ठरलं, पवारांच्या घरावर हल्ला करायचा, सगळं षडयंत्र अॅड गुणरत्न सदावर्तेंनी रचलं. १२ एप्रिलला बारामतीत आंदोलन करायचं, हे सदावर्ते भ्रम करण्यासाठी सातत्याने सांगत होते. पण सगळं नियोजन गुणरत्न सदावर्तेंनी केलं. त्यानुसार ठरल्याप्रमाणे पवारांच्या घरावर एसटी कामगार चालून गेले. या सगळ्या हल्ल्याचं नियोजन सदावर्ते यांनीच केलं, असे गौप्यस्फोट करत अॅड प्रदीप घरत यांनी सदावर्ते यांना चहुबाजूंनी अडकवलं.
मागील दोन दिवसांच्या पोलिस चौकशीत सदावर्ते यांच्या विरोधात पोलिसांच्या हाताला काही महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. सदावर्ते यांच्या घरचं सीसीटीव्ही फुटेज चेक करणं आणखी बाकी आहे. आम्हाला आणखी सदावर्ते यांची चौकशी करायची आहे. त्यामुळे सदावर्ते यांना आणखी ११ दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी मुंबई पोलिसांच्या वतीने सरकारी वकील अॅड प्रदीप घरत यांनी करुन सदावर्तेंना चहुकडून घेरलं. पण न्यायालयाने ११ दिवसांच्या पोलिस कोठडीची विनंती फेटाळून लावत २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
सदावर्ते यांच्या वकिलाचा बचावात्मक पवित्रा
सदावर्ते यांचे वकिल कुलकर्णी यांनी सरकारी पक्षाचे आरोप फेटाळून लावत ज्यावेळी आंदोलन झालं त्यावेळी सदावर्ते मॅट कोर्टात युक्तीवाद करत होते. पण जर सदावर्ते यांच्याविरोधात पोलिसांकडे एवढी सगळी माहिती होती तर मग पोलिस शांत का होते? असा उलटसवाल सदावर्ते यांचे वकील कुलकर्णी यांनी केला.
जवळपास दीड तास दोन्ही बाजूंचा युक्तीवाद चालला. अॅड प्रदीप घरत यांनी जवळपास ४५ ते ५० मिनिटे कोर्टासमोर युक्तीवाद केला तर कुलकर्णी यांनी ३० ते ३५ मिनिटे कोर्टासमोर बचाव केला. अखेरीस कोर्टाने सदावर्ते यांच्या पोलिस कोठडीत २ दिवसांची वाढ केली.