स्थानिक

शांततेचा भंग करणाऱ्या व्यक्तीकडून पुरस्कार घेण्याऐवजी कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन पुरस्कार स्वीकारेन – राजेंद्र पवार

खतपाणी घालणाऱ्यांच्या हस्ते मी हा पुरस्कार कसा स्वीकारावा?

शांततेचा भंग करणाऱ्या व्यक्तीकडून पुरस्कार घेण्याऐवजी कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन पुरस्कार स्वीकारेन – राजेंद्र पवार

खतपाणी घालणाऱ्यांच्या हस्ते मी हा पुरस्कार कसा स्वीकारावा?

बारामती वार्तापत्र

बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन असलेले राजेंद्र पवार हे पुरस्कार वितरण सोहळ्यास अनुपस्थित राहणार आहेत. 2019 चा डॉ पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार राजेंद्र पवार यांना जाहीर झाला होता.  राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. परंतु या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे पवार यांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते आज हे पुरस्कार वितरीत होणार असल्यामुळे राजेंद्र पवार अनुपस्थित राहिले. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बाबतीत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आपण राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणार नसल्याचे राजेंद्र पवार यांनी सांगितलं.

मागील वर्षी बारामतीमधील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांना 2019 रा राज्य सरकारचा पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाला होता. कृषीक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल राजेंद्र पवार यांना हा पुरस्कार जाहीर झाला.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षात कृषी विभागाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचं वितरण झालं नव्हतं. त्यामुळे 198 पुरस्कारांचे वितरण आज पार पडत आहे. आज 2017 ते 2019 या वर्षांचे पुरस्कार वितरण होत आहे. 2017 मधील 64 शेतकरी, 2018 मधील 64 आणि 2019 मधील 70 पुरस्कारार्थी शेतकऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.

पद्मश्री आप्पासाहेब पवार यांचे सुपुत्र व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे असलेल्या राजेंद्र पवार यांचे आजवरचे कार्य राजकारण विरहित शेती आणि शिक्षणावर झाले असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. शेतीतील त्यांनी आजवरच्या दिलेल्या योगदानाबद्दल राज्य सरकारने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली होती. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पवार यांनी आनंद व्यक्त केला होता. परंतु ज्यांच्या हस्ते वितरण होत आहे हे समजताच त्यांनी सोहळ्याला जाणे मात्र टाळले.

संबंधित बातम्या

यासंदर्भात श्री पवार यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी या संदर्भातील नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. ते म्हणाले, शेती आणि शिक्षणातील केलेल्या आजवरच्या कामाबद्दल मला हा पुरस्कार जाहीर होत आहे याचा मलाही खूप आनंद आहे.

राजेंद्र पवार यांची भूमिका… 

यासंबंधी राजेंद्र पवार म्हणाले, या सोहळ्याला न जाण्यामागे अनेक कारणे आहेत. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागणार नाही, याची काळजी या महान राजाने घेतली. त्यांचा आदर्श आपल्यापुढे आहे. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय त्या पंजाबराव देशमुख यांनी कृषी धोरणात बदलासाठी मोठे योगदान दिले. शेतीच्या बाबतीत राज्य समृद्ध केले. मी आजवर शेती आणि शिक्षण क्षेत्रात काम केले. शिक्षण क्षेत्रात आपण महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचे योगदान जाणतो. परंतु दुदैवाने गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

दुर्दैवाने महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे प्रयत्न गेल्या काही दिवसात झाले आहेत. ते पध्दतशीरपणे सुरू आहेत. ज्या महान दाम्पत्याने म्हणजे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची कवाडे खुली केली, त्यांच्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन मत मांडणारे लोक; या महाराष्ट्राचा इतिहास माहीत नसणारे लोक आणि गेल्या काही दिवसात या महाराष्ट्रात नेमकी जी अराजकता निर्माण केली जात आहे, त्याला खतपाणी घालणाऱ्यांच्या हस्ते जर पुरस्कार दिला जाणार असेल तर मी त्यांच्या हस्ते हा पुरस्कार कसा स्वीकारावा? हाच माझा सवाल आहे.

महाराष्ट्राचा इतिहास माहित नसणारे लोक अराजकता निर्माण करत आहेत. त्याला खतपाणी घालणाऱ्यांच्या हस्ते मी हा पुरस्कार कसा स्वीकारावा? त्याऐवजी एखाद्या कृषी कार्यालयात अथवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला असता तर तो मी स्वीकारला असता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram