क्राईम रिपोर्ट

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १ हजाराहून अधिक गुन्हे दाखल- राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपूत

५ कोटी ५५ लाख ६२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १ हजाराहून अधिक गुन्हे दाखल- राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपूत

५ कोटी ५५ लाख ६२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

पुणे, प्रतिनिधि

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने १ ऑक्टोबर २०२४ पासून १ हजार २६७ गुन्हे नोंदविण्यात आले असून १ हजार १७९ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ९८२ वाहनासह ५ कोटी ५५ लाख ६२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली आहे.

जिल्ह्यात सराईत गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ अन्वये ५९ प्रस्ताव संबंधित दंडाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले आहेत. सदर इसमांकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात येत असून आतापर्यंत १२ प्रकरणात रक्कम ११ कोटी ८० हजार रुपये इतक्या रक्कमेचे बंधपत्रे घेण्यात आलेली आहेत. या काळात गोवा राज्य निर्मित मद्याचे तीन गुन्हे उघडकीस आले असून या गुन्ह्यांमध्ये ४१ लाख ७७ हजार ३०५ रुपये किंमतीचा मुद्देमाल २ वाहनांसह जप्त करण्यात आलेला आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे, राज्य उत्पादन शुल्कचे अंमलबजावणी व दक्षता सह आयुक्त प्रसाद सुर्वे *व श्री सागर धोमकर विभागीय उपायुक्त , राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग* यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार १ ऑक्टोबर २०२४ पासून विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून जिल्ह्यातील सर्व हातभट्टी निर्मिती, वाहतूक, विक्री, तसेच धाबे, अवैध ताडी धंदे यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

जिल्हयात कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या अनुज्ञप्तीचे वारंवार सखोल तपासणी करुन अनुज्ञप्तीच्या ठिकाणी नियमबाह्य बाबी आढळल्यास संबंधिताविरुद्ध नियमातील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यासाठी विशेष निरीक्षण मोहिम राबविण्यात येत आहे. अनुज्ञप्तीद्वारे शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याकरिता २४ बाय ७ गस्ती घालण्यात येत आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या एकुण १०९ अनुज्ञप्ती विरुध्द विभागीय विसंगती नोंदविण्यात आले असुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात अवैध मद्य वाहतुकीस आळा घालण्याच्या दृष्टीने एकूण १८ तात्पुरते चेकनाके उभारुन संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी अवैध मद्याची वाहतूक होणार नाही, मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या विहित वेळेत चालू व बंद होतील तसेच अल्पवयीन ग्राहकांना मद्यविक्री होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. तसेच मद्य विक्रीच्या अनुज्ञप्तीचे नियमित निरीक्षण करण्यात येत आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी अवैध मद्याची वाहतुक केली जाणार तसेच कुठल्याही अनुज्ञप्तीमधून विहीत वेळेच्या अगोदर व नंतर मद्य विक्री होणार नाही व वाईन शॉप व देशी दारुच्या दुकानांमधून घाऊक विक्री होणार नाही याकरिता डॉ. सुहास दिवसे, मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांनी त्यांसबंधित कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्ह्यात १८ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापसून ते २० नोव्हेंबर २०२४ मतदानप्रक्रिया पार पडेपर्यंत आणि २३ नोव्हेंबर २०२४ मतमोजणीच्या दिवशी सर्व विधानसभा मतदार संघाचे अधिकृत निकाल घोषित होईपर्यंत कोरडा दिवस (ड्रायडे) घोषित करण्यात आलेला आहे. या काळात जिल्ह्यातील मद्य विक्रीच्या अनुज्ञप्ती बंद राहतील. अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक किंवा मद्य वाटप आदी संबंधी माहिती, तक्रार द्यावयाची असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ व राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग अधीक्षक कार्यालयाच्या ०२०-२६१२७३२१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!