बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे लवकरच सुरू होणार एमआरआय सुविधा
सिमेन्स या जगप्रसिद्ध कंपनीची ३.० टेस्ला प्रणालीची ही मशिन

बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे लवकरच सुरू होणार एमआरआय सुविधा
सिमेन्स या जगप्रसिद्ध कंपनीची ३.० टेस्ला प्रणालीची ही मशिन
बारामती वार्तापत्र
बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील एम.आर.आय यंत्रणा महिन्याभरात कार्यान्वित होणार आहे. यामुळे रुग्णांना निम्म्या किमतीत एम.आर.आय. काढता येतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या सरकारच्या काळात या एम.आर.आय. मशीनसाठी तब्बल २५ कोटी १० लाख रुपये मंजूर केले होते. पुणे जिल्ह्यातील सर्वात आधुनिक एम.आर.आय. मशिन बारामती येथे कार्यान्वित होणार आहे. सिमेन्स या जगप्रसिद्ध कंपनीची ३.० टेस्ला प्रणालीची ही मशिन असून, याद्वारे सर्व प्रकारचे एम.आर.आय. बारामतीच शासकीय दरामध्ये काढता येतील.
शासकीय महाविद्यालयाच्या आवारात ही मशिन कार्यान्वित करण्यात आली असून, काही किरकोळ कामे सध्या वेगाने सुरू आहेत. नवीन वर्षात या मशिनद्वारे एम.आर.आय. काढण्याची सुविधा शासकीय दरात सर्वांसाठी उपलब्ध होईल.
याच महाविद्यालयात शासकीय दरात सिटी स्कॅनची उत्तम सुविधा उपलब्ध असून, ती यंत्रणाही अत्याधुनिक आहे. या मशीनसोबतच एम.आर.आय. सुविधा शासकीय दरात व्हावी अशी मागणी होती. याबाबत राज्य शासनाकडे अजित पवार यांनी पाठपुरावा करून निधी मंजूर करून प्रत्यक्ष मशिन खरेदी होत ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. बारामती येथील या शासकीय महाविद्यालयात बारामतीसह, इंदापूर, दौंड, फलटण, पुरंदर, श्रीगोंदा या परिसरातून लोक उपचारासाठी येत असतात. ही मशिन कार्यान्वित झाल्यानंतर कंपनीकडून संबंधित टेक्निशियन यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
बारामती येथे एम.आर.आय. ही सुविधा होणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना यानिमित्ताने शासकीय दरात एम.आर.आय. करता येणार आहे.
-डॉ. राजेश उमप, रेडिओलॉजिस्ट, अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती