बारामती रेशीम कोष मार्केट मध्ये कोषास प्रति किलोस रू. ७२५/- दर
एकुण १६० टन कोष विक्री
बारामती वार्तापत्र
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे रेशीम कोष मार्केट मध्ये आज दि. ४ नोव्हेंबर रोजी रू. ७२५/- प्रति किलो असा उच्चांकी दर मिळाला. बारामती बाजार समितीचे रेशीम मार्केट हे ऑनलाईन मार्केट असल्याने महाराष्ट्र राज्यातील तसेच कर्नाटक, तामिळनाडु, पश्चिम बंगाल या राज्यातील खरेदीदार यामध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे कोषास चांगला दर मिळत आहे.
रेशीम कोषास वाढत असलेल्या दरामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात तुती लागवडीकडे वळत आहे. बारामती मध्ये पारदर्शक व्यवहार, कोषाचे इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर अचुक वजन, ऑनलाईन पेमेंट, कुठलीही कडती नाही. यामुळे रेशीम कोष उत्पादक शेतक-यांनी आपला कोष बारामती रेशीम कोष मार्केट मध्येच विक्रीस आणावा असे आवाहन बारामती बाजार समितीचे सभापती सुनिल पवार व उपसभपाती निलेश लडकत यांनी केले आहे.
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीने समिती मार्फत कोष खरेदीसाठी व्यापा-यांना तसेच रिलर्स यांना लायसेन्स दिले असल्याने महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातील लासन्सधारक खरेदीदार ऑनलाईन कोष खरेदी करीत आहेत.
रेशीम मार्केट मध्ये आज एकुण ५४० किलो कोषाची आवक होऊन किमान रू. ५९० तर सरासरी रू. ६९०/- असा दर मिळाला आहे. काळुराम हरिभाऊ घाडगे आणि प्रमोद दादाभाऊ घाडगे रा. दावडी ता. खेड जि. पुणे या रेशीम कोष उत्पादक शेतक-यांच्या कोषास जादा दर मिळाला आहे. सन २०२२ पासुन रेशीम मार्केट सुरू झाले पासुन आत्तापर्यन्त ७ कोटी रूपयांची उलाढाल झाली असुन एकुण १६० टन कोष विक्री झाली आहे.
बारामतीसह पुणे, सोलापुर, अमहदनगर, सातारा या जिल्हयातुन शेतकरी कोष घेऊन येत असुन जादा दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी असल्याची माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.