स्थानिक

पुणे जिल्ह्यात ११ साखर कारखान्यांची धुराडी सुरु 

यंदा गाळपासाठी सुमारे एक लाखाच्या आसपास ऊस उपलब्ध

पुणे जिल्ह्यात ११ साखर कारखान्यांची धुराडी सुरु

यंदा गाळपासाठी सुमारे एक लाखाच्या आसपास ऊस उपलब्ध

बारामती वार्तापत्र

विधानसभेच्या निवडणुकीमुळे चालू वर्षी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम उशिराने सुरू झाला आहे. १५ नोव्हेंबरपासून साखर कारखान्यांनी गळीत हंगामास सुरुवात केली असली, तरी हळूहळू साखर कारखाने सुरू होत आहेत.

पुणे जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी अशा एकूण ११ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे, अशी माहिती प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलाच दणका दिला होता. त्यातच विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्याने साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात काही प्रमाणात अडचणी आल्या होत्या. शासनाने १५ नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले होते.

त्यामुळे साखर कारखान्याचा गळीत हंगाम धीम्या गतीने सुरू झाला आहे. चालू गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप करण्याचे नियोजन कारखान्यांनी केले आहे. मात्र ऊस शेतात जुलैपासून पाणी राहिल्याने उसाची फारशी वाढ झाली नसल्याने उसाच्या उत्पादनात घट होत असल्याचे चित्र आहे.

पुणे जिल्ह्यातील पूर्व, उत्तर भागात उसाचे दरवर्षी उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी उशिराने झालेल्या पावसामुळे जवळपास सव्वा लाख हेक्टरवर उसाच्या लागवडी झाल्या असल्याची स्थिती आहे. यंदा गाळपासाठी सुमारे एक लाखाच्या आसपास ऊस उपलब्ध आहे. जिल्ह्यात जवळपास १६ साखर कारखाने असून, गाळपासाठी सर्वच कारखाने पुढाकार घेतली अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामध्ये सहकारी १० व खासगी ६ साखर कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता ९६,७५० टन एवढी आहे.

सध्या सुरू झालेल्या कारखान्यामध्ये सहकारी ६ व खासगी ५ साखर कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता एक लाख १७ टन एवढी आहे. आतापर्यंत १४ लाख ९ हजार १६६ टन उसाचे गाळप केले असून, त्यातून १० लाख ५४ हजार ६७३ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा सरासरी ७.४८ टक्के एवढा आहे.

आतापर्यंत झालेल्या गाळपामध्ये बारामती अॅग्रोने सर्वाधिक आघाडी घेतली आहे. या कारखान्याने तीन लाख ४५ हजार ४२४ टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून २ लाख ८ हजार ६५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तर साखर उतारा सरासरी ६.९९ टक्के एवढा आहे. तर दौंडमधील साईप्रिया शुगर्स, इंदापुरातील कर्मयोगी शंकरराव पाटील, नीरा भीमा या कारखान्यांचा अद्याप गळीत हंगाम सुरू झालेला नाही.

जिल्ह्यात सुरू झालेले कारखानानिहाय उसाचे गाळप, (टनांमध्ये)

कारखाना ऊस गाळप, मे टन साखर क्विंटल साखर उतारा टक्के

सोमेश्‍वर १,४९,१८१ १,३९,१०० ९.५३

दि माळेगाव १,५१,१८० १,४४,१०० १०.५१

श्री छत्रपती ७१,४५४ ५१,८०० ७.५९

विघ्नहर ३७,६९० २६,९०० ९.८९

श्री संत तुकाराम ४७,९९० ४३,९२५ ९.७८

भीमा शंकर १,२२,८४० १,१९,८०० ९.५६

श्रीनाथ म्हस्कोबा ८१,७८० ३९,९८५ ४.९८

बारामती अॅग्रो ३,४५,४२४ २,०८,६५० ५.९९

दौंड शुगर २,७४,८३० १,८२,२०० ७.४२

व्यंकटेशकृपा ३०,५६० १३,४८० ५.४६

पराग अॅग्रो ९६,२३७ ८४,७३३ ८७६

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram