ओबीसी समाज आक्रमक;बारामतीत उपमुख्यमंत्री,अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन
भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही
ओबीसी समाज आक्रमक;बारामतीत उपमुख्यमंत्री,अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन
भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही
बारामती वार्तापत्र
ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे सकल ओबीसी समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील सहयोग या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन व जाहीर निषेध करण्यात आला.
याबाबत पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.
ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान न दिल्यामुळे राज्यातील सकल ओबीसी समाजात नाराजी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षाला सकल ओबीसी मतदारांनी भुजबळ यांच्या आदेशाने ९७ ते ९८ टक्के मतदान केले. असे असताना ओबीसींचा लढा एकतर्फी अंगावर घेऊन लढणारे ओबीसी नेते छगन भुजबळ यांंना जाणीवपुर्वक डावलण्यात आले आहे. हा राज्यातील ओबीसी समाजावर प्रचंड अन्याय आहे. हा ओबीसी समाजाचा अपमान आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन केल्याचे ओबीसी समाजाने निवेदनात नमुद केले आहे. या निवेदनावर ज्ञानेश्वर काैले, अनिल लडकत, निलेश टीळेकर, किशोर हिंगणे, बापुराव लोखंडे, संजय गिरमे, दत्ता लोणकर, बापु बनकर, महावीर लोणकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
छगन भुजबळांचा राष्ट्रवादीला बायबाय?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राष्ट्रवादीकडून छगन भुजबळांना राज्यसभेची ऑफर देण्यात आली होती. मात्र ती ऑफर छगन भुजबळांनी धुडकावून लावली आहे. तर राष्ट्रवादीतील बहुतांश आमदारांनी छगन भुजबळ यांना मंत्रिपद द्यायला हवं होतं, असे मत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच भुजबळांवर अन्याय झाला तर आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत फटका बसू शकतो, अशी भीती आमदारांमध्ये असल्याचे समजते. छगन भुजबळ आणि नाशिक आणि येवल्यात त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात छगन भुजबळ आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. आता छगन भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की राष्ट्रवादीला बायबाय करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.