पन्नास वर्षांपूर्वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयास भेट
एकूण २७ माजी विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग
पन्नास वर्षांपूर्वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयास भेट
एकूण २७ माजी विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग
बारामती वार्तापत्र
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष १९७४—७५ मध्ये वाणिज्य शाखेतून बी.कॉम.पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयास आवर्जून भेट दिली.
सदर भेटीमध्ये बारामती व बारामती परिसरातील वाणिज्य शाखेंतर्गत पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. महाविद्यालयीन भेटीमध्ये एकूण २७ माजी विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
यामध्ये बारामती व बारामती परिसरातील विविध शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवेत असणार्या आणि व्यावसायिकांचा समावेश होता. तसेच विशेष उपस्थिती म्हणुन पुणे पीपल्स सहकारी बँकेचे अध्यक्ष सी. ए. श्री जनार्दन रणदिवे उपस्थित होते.
महाविद्यालयातर्फे सदर भेटीचे नियोजन व माजी विद्यार्थ्यांचा स्वागत व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. माजी विद्यार्थी स्वागत व सत्कार समारंभाचे अध्यक्ष म्हणून अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य आणि याच बॅचचे माजी विद्यार्थी माननीय श्री. चंद्रगुप्त माणिकलाल शाह वाघोलीकर यांनी भूषविले.
सदर स्वागत व सत्कार समारंभादरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.अविनाश जगताप यांनी मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. तसेच उपस्थितांसमोर महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या प्रगतीचा लेखाजोखा सविस्तरपणे मांडला.
त्याचप्रमाणे वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ.जनार्दन पवार यांनी वाणिज्य विभागांमध्ये शिकवले जाणारे अभ्यासक्रम, स्वायत्तता आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या धर्तीवर वाणिज्य शाखेमध्ये झालेले बदल यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणामध्ये मा.श्री.चंद्रगुप्त शाह वाघोलीकर यांनी महाविद्यालयाची झालेली प्रगती आणि भविष्यकालीन धोरणांबद्दल उपस्थितांना माहिती दिली.
भेटीदरम्यान माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आणि महाविद्यालयास एकूण रुपये १,४०,०००/- देणगी स्वरुपात दिले.
सदर भेटी दरम्यान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉ.अशोक काळंगे प्रा.डॉ.सचिन गाडेकर, रजिस्ट्रार श्री.अभिनंदन शहा आणि वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
सदर भेटीबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. जवाहर शहा वाघोलीकर, माननीय सचिव श्री मिलिंद शहा वाघोलीकर आणि खजिनदार मा.श्री.विकास शहा लेंगरेकर यांनी समाधान व्यक्त केले.