निमगाव येथे भांडणातून तरुणावर चाकूने वार
सहा ते सात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल
निमगाव येथे भांडणातून तरुणावर चाकूने वार
सहा ते सात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल
इंदापूर प्रतिनिधी –
निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे झालेल्या भांडणातून एकावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली असून, यामध्ये नामदेव बापूराव राऊत हे जखमी झाले असून, याप्रकरणी आकाश दिलीप बनसोडे व इतर सहा ते सात अनोळखी व्यक्तींविरोधात इंदापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत नामदेव बापूराव राऊत (वय 31, रा. निमगाव केतकी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि.30) दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान निमगाव केतकी येथे फिर्यादीच्या दुकानासमोर आरोपी आकाश दिलीप बनसोडे व फिर्यादी यांच्यामध्ये वाद झाला. त्यातून चिडून बनसोडे याने त्याच्या इतर सहा ते सात साथीदारांना बोलावून घेतले. त्यांनी फिर्यादी व फिर्यादीची आई, पत्नी, भाऊ व भावजय यांना लाकडी दांडक्याने, दगडाने, तसेच लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यात आरोपी बनसोडे याने त्याच्याकडीलचाकू फिर्यादीच्या पोटात खुपसला. त्यात फिर्यादी जखमी झाला. तसेच, फिर्यादी व फिर्यादीच्या परिवाराला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी निघून गेले. जखमी फिर्यादीला इंदापूर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले.
या घटनेचा पुढील तपास इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन मोहिते करत आहेत.