‘माझी सुरेश धस यांच्याकडून मोठी अपेक्षा होती’ ;खासदार सुप्रिया सुळे
फक्त माणुसकी म्हणून या प्रकरणाकडे पाहायचे होते.

‘माझी सुरेश धस यांच्याकडून मोठी अपेक्षा होती’ ;खासदार सुप्रिया सुळे
फक्त माणुसकी म्हणून या प्रकरणाकडे पाहायचे होते.
बारामती वार्तापत्र
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाकडे मी पक्ष म्हणून किंवा राजकारण म्हणून पाहिलं नाही. मला फक्त माणुसकी म्हणून या प्रकरणाकडे पाहायचे होते.
आणि तेही या प्रकरणाकडे माणुसकी म्हणूनच पाहतील, अशी मला अपेक्षा होती. मात्र, दुर्दैव आहे. राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने सगळे करायला पाहिजे होते. माझी सुरेश धस यांच्याकडून मोठी अपेक्षा होती, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर उद्या (दि.१८) रोजी खासदार सुप्रिया सुळे मस्साजोग गावाला भेट देणार आहेत. खा. सुप्रिया सुळे (दि.१७) रोजी बारामती दौऱ्यावर होत्या. दरम्यान, त्यांनी येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. बारामती येथे पत्रकारांशी बोलताना सुळे यांना, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची धार कमी करून त्यांचे महत्त्व कमी करण्यासाठी सुरेश धस यांचा वापर झाला का? आणि सुरेश धस यांचे बिंग फोडण्यामागे राजकारण आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर सुळे यांनी धस यांच्याबाबत ही प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी सुळे पुढे म्हणाल्या, धस रोज पोटतिडकीने चॅनलवर बोलत होते. त्यामुळे मला असे वाटले होते की, जोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही किंवा बीडमधील गुन्हेगारी थांबत नाही तोपर्यंत ते स्वस्त बसणार नाहीत, अशी माझी भाबडी अपेक्षा होती, असे सुळे म्हणाल्या.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी याच्याकडे राजकारण म्हणून पाहत नाही. सहकारी संस्थेमध्ये राजकारण यायला नको. मात्र, जर शेतकरी अस्वस्थ असतील आणि शेतकऱ्यांना ही निवडणूक लढायची असेल, तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
संजय राऊत यांची चिडचिड सहाजिकच
शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान केला त्यामुळे खासदार संजय राऊत यांची चिडचिड वाढली यासंदर्भात बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, खासदार संजय राऊत यांची शरद पवारांविषयीची चिडचिड सहाजिकच आहे. कारण संजय राऊत यांचे शरद पवारांवरील प्रेम आणि हक्कदेखील तेवढाच आहे. या संदर्भात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) आम्ही एकत्रित समन्वय घडवून आणू. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेचादेखील निवडणूक निकालावर परिणाम झाला ही वस्तुस्थिती आहे. परंतु ज्या ज्या योजना जाहीर केल्या अशा सर्व योजना बंद पडतील. राज्यासमोर आर्थिक संकटे याच बरोबरीने आव्हाने मोठ्या प्रमाणावर आहे. या आव्हानांपुढे जाहीर केलेल्या योजना कितपत तग धरतील हे वेळेच सांगेल, असेही त्या म्हणाल्या.