विद्या प्रतिष्ठानचे व्हीपीकेबी आयईटी, बारामती येथे महिला दिनानिमित्त आरोग्य जागृती व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
शिबिरांमध्ये ६५ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, महिला यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली

विद्या प्रतिष्ठानचे व्हीपीकेबी आयईटी, बारामती येथे महिला दिनानिमित्त आरोग्य जागृती व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
शिबिरांमध्ये ६५ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, महिला यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी, बारामती येथे ०८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील महिला तक्रार व समस्या निवारण समिती यांच्या वतीने विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, महिला कर्मचारी यांच्याकरिता आरोग्य जागृती व आरोग्य तपासणी या विषयावर मार्गदर्शन व शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त तथा सचिव ॲड. नीलिमा गुजर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. गौरी भोईटे यांनी केले.
तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रथम वर्ष अभियांत्रिकी शाखेत शिकणारी विद्यार्थिनी कु. सलोनी साव हिने करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून बारामती येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. स्मिता पाटील, तसेच प्रा. डॉ. सविता वाले या दोन्ही वक्त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
त्यामध्ये प्रामुख्याने डॉ. स्मिता पाटील यांनी समाजामध्ये प्राचीन काळापासून या समाजाला योगदान देणाऱ्या महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. तसेच समाजामध्ये स्त्री पुरुष समानता किती महत्त्वाची आहे, तसेच स्त्री पुरुष या सर्वांनाच लैंगिक शिक्षण देणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे याविषयी त्यांनी प्रबोधन केले.
तसेच आपल्या दैनंदिन जीवनातील आरोग्य विषयी तक्रारी यासाठी आपण आपली दिनचर्या बदलली पाहिजे, तसेच आपण समाजामध्ये व्यक्तिगत वैवाहिक जीवन जगत असताना स्त्री आणि पुरुष यांच्यातील आरोग्यविषयक तक्रारीसाठी प्रत्येक वेळी स्त्रीला जबाबदार धरणे हे चुकीचे आहे बऱ्याचदा दोष हा पुरुषांमध्ये देखील असू शकतो हे देखील त्यांनी उपस्थितांना समजून सांगितले.
डॉ. सविता वाले यांनी मानवाच्या जीवनात आयुर्वेद आणि योग शास्त्र यांचे असणारे महत्त्व त्यांनी पटवून दिले. आपण जर योग्य ती जीवनशैली अवलंबिली तर आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो, आपली दिनचर्या बदलणे या अत्यंत गरजेचे आहे हे त्यांनी उपस्थितांना समजून सांगितले. मानवाच्या शरीर प्रकृतीमध्ये पंचमहाभूते, वात, पित्त, कफ, पंचकोश, अष्टांग योग यांचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे हे त्यांनी समजावून दिले.
तसेच आणि उपस्थितांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. गौरी भोईटे यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील महिला अंतर्गत समस्या व तक्रार निवारण समिती यांच्यामार्फत करण्यात आले होते. यासाठी समितीच्या अध्यक्ष प्रा. डॉ. अपर्णा सज्जन समितीच्या सदस्य प्रा. गौरी भोईटे, प्रा. वर्षा सुरवसे, कुसुमांजली जगताप, स्वाती लाड तसेच प्रा. दीपक सोनवणे या सर्वांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले.
या शिबिरांमध्ये ६५ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, महिला यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. यामध्ये रक्तदाब, वजन, उंची, रक्तातील साखरेचे प्रमाण, हिमोग्लोबिन यासारख्या अनेक तपासण्या करण्यात आल्या.
तसेच उपस्थित डॉक्टर व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व महिला त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी समजून घेण्यात आल्या व त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.