
शिवजयंती निमित्त बारामती मध्ये विविध कार्यक्रम
ऐतिहासिक ग्रंथ व पुस्तकांचे प्रदर्शन
बारामती वार्तापत्र
बारामती शहरांमध्ये तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवजयंती निमित्त छत्रपती जन्मोत्सव समिती,बारामती मार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १३ मार्च ते दिनांक १६ मार्च दरम्यान नटराज नाट्य कला मंदिराच्या कलादालनामध्ये शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन तसेच शिवछत्रपतींच्या आरमारातील युद्धनौकांचे प्रदर्शन शिवकालीन नाण्यांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
सदर प्रदर्शनाच्या ठिकाणी ऐतिहासिक ग्रंथ व पुस्तकांचे प्रदर्शन तसेच माफक दरात विक्री देखील करण्यात येणार आहे.
दिनांक १३ मार्च २०२५ रोजी शिव चरित्रातील निवडक प्रसंगांवर आधारित शिवनृत्याविष्कार हा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमादरम्यान छत्रपती जन्मोत्सव समिती मार्फत घेतल्या गेलेल्या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस समारंभ होणार आहे.
दिनांक १४ मार्च २०२५ रोजी ह.भ.प. अवधूतजी गांधी यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील गीतांचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक १५ मार्च २०२५ रोजी शिवशाहीर चंद्रकांत माने यांचा महाराष्ट्राचा मराठी बाणा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वरील तीनही कार्यक्रमा नटराज नाट्य कला मंदिराच्या सभागृहामध्ये संध्याकाळी सहा ते नऊ या दरम्यान होणार आहेत.
तसेच दिनांक १७ मार्च २०२५ रोजी तिथीनुसार शिवजयंती निमित्त शिवछत्रपतींच्या पारंपारिक पालखीचे आयोजन करण्यात आले असून सदर पालखीचे प्रस्थान सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान कसबा येथून होऊन इंदापूर चौक, गांधी चौक मार्गे समारोप भिगवन चौकातील गणेश मंदिरा नजीक होणार आहे. सदर पालखीमध्ये स्वराज्याचे रणमर्द शीलेदार , स्वराज्याचे गुप्तहेर , पारंपारिक वेशातील बारामतीकर, तसेच पारंपारिक वाद्य पथके जसे ढोल पथक , झांज पथक , हलगी पथक , वारकरी पथक, गजी नृत्य पथक सहभागी होणार आहेत तरी सुज्ञ बारामतीकरांनी पारंपारिक पद्धतीने काढल्या जाणाऱ्या शिवप्रभूंच्या पालखीस तसेच विविध कार्यक्रमांसाठी उपस्थित रहावे असे नम्र आवाहन छत्रपती जन्मोत्सव समिती बारामती मार्फत करण्यात आले आहे.