स्थानिक

बारामती खाकी वर्दिचा धाक राहिलाय का? वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात युवकाला बेदम मारहाण,उपमुख्यमंत्री;अजित पवार संतापले

माझ्या जवळच्या कार्यकर्त्याचा मुलगा असला तरी मकोका लावणार

बारामती खाकी वर्दिचा धाक राहिलाय का? वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात युवकाला बेदम मारहाण,उपमुख्यमंत्री;अजित पवार संतापले

माझ्या जवळच्या कार्यकर्त्याचा मुलगा असला तरी मकोका लावणार

बारामती वार्तापत्र 

बारामतीत विकास कामे करतो आहे. पण काही जण वेडे वाकडेपणा करतात. एक जण तर फुटपाथवर गाडी लाऊन गप्पा मारत होते. पोलिसांना गाडी जप्त करायला सांगितली आहे. एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, त्यामध्ये दोन मोटरसायकलवरुन चार मुलं आली.

त्यांनी एकाला मारमार मारलं. त्याला बेल्ट, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. अजित पवारांच्या कितीही जवळच्या कार्यकर्त्याच्या मुलाने असं केलं तरी त्याला सोडणार नाही. तो असेच गुन्हे करत राहिला तर मकोका लावायला कमी करणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

बारामतीमधील मारहाणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरुन अजित पवारांनी आज बारामतीमध्ये कोणीही कायदा हातात घेतला तर त्यांना सोडणार नाही, असा दम भरला आहे. ते म्हणाले की, तुमची मुलं- मुली काय करत आहेत, हे पाहणं पालकांची नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी पालक, नातेवाईकांनी पार पाडली पाहिजे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांनाही वेळीच कारवाईचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, ‘वनवे, पार्किंग, गार्डन अशा सर्व सार्वजनिक ठिकाणी कोणतेही गैरकृत्य खपवून घेतले जाणार नाही. पोलिसांनाही एक स्पेशल गाडी दिली जाईल, त्यांनी या सर्वांवर नजर ठेवायची आहे. कोणाचंही चुकीचं कृत्य खपवून घेतले जाणार नाही. गैरकृत्य करणारा अजित पवारांच्या कितीही जवळचा असला, तरी त्याला माफी नाही. कोणी काही चूक केली असेल तर त्यासाठी कायदेशीर मार्ग आहे. त्यांची पोलिसांकडे तक्रार करा, पण कोणीही कायदा हातात घेतला तर त्याला मकोका लावायला कमी करणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी बारामती येथील कार्यक्रमात दिला.

कोणी काही गैरकृत्य केलं आणि त्यानंतर माझ्याकडे येतात आणि म्हणातात दादा, पोटात घ्या. अरे काय पोटात घ्या? पोट फुटायला लागलंय. ज्यांनी फोन केला त्यांना लाज, शरम कशी वाटत नाही, असंही अजित पवारांनी गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना खडसावलं आहे.

नेमकं काय घडलं होतं?

बारामती तालुत्यातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ 3 एप्रिल रोजीचा आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती एका खुर्चीवर बसलेली दिसत आहे. हातात मोबाईल घेऊन ही व्यक्ती काहीतरी करत असल्याचं दिसतंय. याच वेळी अचानकपणे दोन लोक त्याच्याकडे आलाआहे. या लोकांनी खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला थेट मारहाण केली आहे. मारहाण करत असताना त्याच्या हातातील मोबाईलही हिसकावून घेतला. तसेच दुसऱ्या एका व्यक्तीने समोरच्या टेबलवर ठेवलेले स्टिलचे कुलूप घेऊन बसलेल्या व्यक्तीने डोक्यावर जोरदार प्रहार केल्याचं दिसतंय. पुढे याच व्यक्तीला दोघांनी ओढत नेल्याचंही सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे.

अरे पोटात तरी किती घ्यायचं?

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच घटनेवर महत्त्वाचं विधान केलं आहे. त्यांनी मोथेफीरूंना सज्जड दम दिलाय. अशा प्रकारचं कृत्य कोणीही केलं तर त्याला मकोका लावण्यासाठी मी मागे-पुढे पाहणार नाही. अशा घटना घडल्या की मला मुंबईतून फोन येतात. दादा एवढ्यावर पोटात घ्या, अशी विनंती केली जाते. पण अरे पोटात तरी किती घ्यायचे? सांगणाऱ्याला लाज वाटली पाहिजे, असा आक्रमक पवित्रा अजित पवार यांनी घेतला. तसेच कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कठोर पावले उचलले जातील, असं आश्वासनही त्यांनी दिलंय.

दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालाच्या मागे झालेल्या मारहाणीच्या घटनेत पोलीस तपासातून नेमकं काय समोर येणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या प्रकरणातील गुन्हेगाारंवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

Related Articles

Back to top button