‘सत्ता, पैसा आणि दबाव.. पण आम्ही नाही झुकत!’ चंद्रराव तावरे यांची स्फोटक मुलाखत; अजित पवारांच्या कारभारावर थेट आरोप

‘सत्ता, पैसा आणि दबाव.. पण आम्ही नाही झुकत!’ चंद्रराव तावरे यांची स्फोटक मुलाखत; अजित पवारांच्या कारभारावर थेट आरोप
मतपत्रिकांवर पेनाच्या रेघा मारून ४६०० मतं बाद केली.
✍️ बारामती ; प्रतिनिधी
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते चंद्रराव तावरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट आणि गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये त्यांनी सहकार क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप, आर्थिक दबाव, आणि निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांवर परखड भाष्य केले आहे.
‘१९९१ साली मी ६०० रुपये दर दिला होता..!’
“१९९१ साली राज्यभर २५० रुपये ऊस दर असताना, मी ६०० रुपये दिला. त्यावेळी कार्यक्षेत्रात प्रचंड ऊस होता. मी पवारसाहेबांकडे जाऊन सांगितलं की जर ऊस थांबला तर नुकसान होईल. त्यासाठी शासनाने वाहतूक व रिकव्हरी लॉस दिला तर आम्ही सगळा ऊस नेऊ शकतो.. त्यानुसार आम्हाला मदत मिळाली आणि कारखाना जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालवला. त्यावेळी आमचं गाळपही दुप्पट झालं आणि शेतकऱ्यांना फायदा मिळाला.
ही दरवाढीची परंपरा आम्ही कायम चालू ठेवली.” असे चंद्रराव तावरे यांनी सांगितले.
“आम्ही हाडाचे शेतकरी. शेती हेच आमचं उत्पन्नाचं साधन. कारखाना चालवताना खर्च कमी ठेवून, योग्य व्यवहार करत आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतो. ऑनलाईन माल खरेदी करून, जिथे शक्य तिथे बचत करून आम्ही दरवाढ देतो. पण ही पारदर्शकता, शेतकरीहित, जादा दर देणं अजित पवारांना मान्य नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
ते पुढे म्हणाले, “अजित पवारांचे अनेक कारखाने आहेत. बहुतेक दुसऱ्यांच्या नावावरच.. ते सुमारे १ कोटी टन ऊस गाळतात. आम्ही ५०० रुपये दर वाढवला की त्यांना किमान २०० रुपये तरी वाढवावे लागतात. त्यामुळे त्यांना
दरवाढ म्हणजे आर्थिक फटका वाटतो.
दुसरीकडे शेतकऱ्याकडे चांगला पैसा आला की तो कुणाचं ऐकत नाही. आणि सगळ्यांनी आपल्याकडे यावं, आपलं ऐकावं ही अजित पवारांची भूमिका आहे. मात्र पैसा आल्यामुळे शेतकरी कुणाचंच ऐकत नाहीत किंवा कुणाच्या दारातही जात नाहीत ही बाब अजित पवारांना खटकत असल्याचे त्यांनी सांगितले.
“कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार, दत्तात्रय भरणे, रामराजे यांनी मते मागण्याचा किंवा वार्षिक सभेत हस्तक्षेप करण्याचा काहीही संबंध नाही. ते या संस्थेचे सभासद नाहीत. ते स्वत:च्या संस्थेतील सभेला कोणाला बोलावतात का..? असा सवाल करून चंद्रराव तावरे म्हणाले, अजित पवार केवळ प्रशासनावर दबाव टाकून राजकारण करतात.
मागच्या निवडणुकीत त्यांच्या लोकांनी एका अधिकाऱ्याला फोन करून सासऱ्याला मत द्यायला सांगितलं. अशा पद्धतीने दबावाचं आणि दमदाटीचं राजकारण ते करतात.
आता दोन दिवसांपूर्वी जिल्हा बँक रात्रीच्या वेळी चालू होती.. तिथे बघितल्यावर मतदार याद्या ठेवल्या गेल्या. त्यात कोणी कुणाकडे जायचं ही नावं होती. एवढंच नाही तर दोन-दोन गाड्यांतून त्यांच्या पीएंनी उपस्थिती लावली.
त्यांच्याकडून आता १० हजार रुपये मताला वाटले जात असल्याची चर्चा आहे. पण आजवर आम्ही एक रुपयाही वाटलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.
मागच्या वेळेस मतदान पेट्या सील न करता खासगी खोलीत ठेवण्यात आल्या. मतपत्रिकांवर पेनाच्या रेघा मारून ४६०० मतं बाद केली. काही गठ्ठे तर फेकून दिले गेले. त्यामुळे आता तरी पारदर्शकपणे निवडणुका घ्या असे म्हणत चंद्रराव तावरे यांनी “आमचं हे पॅनल कोणत्याही पक्षाचं नाही. ही लढाई शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांनी उभी केलेली आहे. म्हणून आम्ही कोणत्याही वरिष्ठ नेत्यांना बोलवत नाही, असे स्पष्ट केले.
आम्ही नवीन सभासद जोडायला विरोध केल्याचं सांगतात.
वास्तविक सोमेश्वर कारखान्याची ११ गावे जोडण्यामागे अजित पवारांचे मतांचे राजकारण होते. त्यामुळे आम्ही या विषयाला विरोध केला. मात्र त्याच भागातील काही नवीन सभासद केले आहेत, ही बाबही तितकीच सत्य असल्याचे चंद्रराव तावरे यांनी नमूद केले.
आम्ही अजित पवारांना घाबरत नाही.. !
मुलाखतीचा शेवट करताना तावरे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्र अजित पवारांना घाबरतो, पण आम्ही नाही. आम्ही लढत राहू. सत्तेचा वापर, पैशांची ताकद आणि दबाव या सगळ्यावर मात करून आम्ही शेतकऱ्यांसाठी उभं राहू.. शेतकरी हित हेच धोरण डोळ्यांसमोर ठेवून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत.
यावरून तरी अजित पवार बोध घेतील काय..?
दरम्यान, युगेंद्र पवार यांनी अजित पवारांच्या चेअरमनपदावर भाष्य करताना या निवडणुकीत त्यांनी सामंजस्याची भूमिका घेत या पदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देणे आवश्यक होते, असे म्हटले आहे.
तर शरद पवार गटाचे उमेदवार सुशील जगताप यांनी अजित पवारांना सत्तेचं विकेंद्रीकरण न करता केंद्रीकरण करायचे आहे. ज्यावेळी राजा व्यापारी होतो, तेव्हा प्रजा भिकारी होते.
तशीच अवस्था माळेगाव कारखान्याच्या सभासदांची करण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप केला आहे. आता बोलक्या प्रतिक्रिया आल्यानंतर तरी अजित पवार बोध घेतील का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला.






