इंदापूर

डास निर्मुलनाचा डॉ. सुश्रुत शहा यांचा बिजवडी पॅटर्न पोहोचला मंत्रालयात, संपूर्ण राज्यात हा प्रकल्प राबविण्याचे मिळाले संकेत !

कर्मयोगी कारखाना कार्यक्षेत्रातील बिजवडी हे महत्त्वपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र

डास निर्मुलनाचा डॉ. सुश्रुत शहा यांचा बिजवडी पॅटर्न पोहोचला मंत्रालयात, संपूर्ण राज्यात हा प्रकल्प राबविण्याचे मिळाले संकेत !

कर्मयोगी कारखाना कार्यक्षेत्रातील बिजवडी हे महत्त्वपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र

इंदापूर; प्रतिनिधी

डासाच्या प्रादुर्भावामुळे होणारे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया व इतर आजार रोखण्यासाठी बिजवडी (ता. इंदापूर, जि. पुणे) प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत श्रेणिक शहा यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत जिव्हाळ्याच्या सर्व शक्ती एकत्र करून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गावर असलेल्या गोतंडी गावात प्रथम शौचालयाच्या वायूवाहक नलिकेला पिशवी बसविण्याचा राबविलेला यशस्वी पथदर्शी प्रयोग मुंबई, मंत्रालयात पोहोचला असून या प्रयोगास बिजवडी पॅटर्न म्हणून ओळखले जात आहे.

बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध नावीन्यपूर्ण कल्पना, उपक्रमांबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी डॉ. सुश्रुत श्रेणिक शहा यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या प्रकल्पाचे तसेच कामांचे लेखी विशेष कौतुक करून अभिनंदन केले आहे तर यासंदर्भात डॉ. सुश्रुत शहा यांचा मंत्रालयात सत्कार करण्यात आला आहे.

क्षेत्रीय कार्यालयांकरीता असलेल्या मुख्यमंत्री १०० दिवसांच्या कार्यक्रमात बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, पुणे परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोबोट द्वारे स्वच्छता, स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली, कार्यालयीन स्वच्छता, कर्मचारी अडीअडचणी सोडविणे, साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविणे आदी कामे १०० दिवसांत पूर्ण करण्यात आली. मुंबईत मंत्रालय आरोग्य सचिव निपुण विनायक व वीरेंद्र सिंह, मंत्रालय आरोग्य मंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. नितीन देवमाने, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. कैलास बाविस्कर यांच्या उपस्थितीत बिजवडी प्राथमिक आरोग्यकेंद्राअंतर्गत राबविलेल्या विविध उपक्रमांचे दृकश्राव्य ध्वनिफितीव्दारे सादरीकरण करण्यात आले.

या पथदर्शी प्रयोगाची यशोगाथा पाहून हा प्रयोग संपूर्ण राज्यात राबविण्याचे संकेत मंत्रालय, आरोग्य विभागातून देण्यात आल्याने बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे महत्त्व राज्यात वाढले आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये मदर प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडी अंतर्गत गोतंडी गाव श्री. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील महत्त्वाचे आरोग्य सेवा केंद्र आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया सारख्या कीटकजन्य आजारांच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य क्षेत्रातील जेष्ठ अनुभवी तज्ज्ञ डॉ. अभय तिडके, कालठण नं. १ येथील आरोग्य सेवक श्री. इब्राहिम मकानदार यांच्या मार्गदर्शनानुसार वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत श्रेणिक शहा यांनी देवेंद्र उत्तेकर, सोनाली यादव, उज्ज्वला पवार, आश्लेषा वाघमोडे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन वर्ष २०२४ मध्ये डास निर्मुलन शेड नेट प्रकल्पाची सुरुवात केली. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ग्रामीण भागातील एकूण दहा हजार घरांच्या शौचालयावरील वायूवाहक व्हेंट पाईपना व्हर्जिन शेड नेट पिशव्या बसविण्याचे धोरण निश्चित करण्यात आले. सुरवातीस रेड झोन मध्ये असलेल्या या गावात आरोग्य सेवक राहुल कांबळे व सहकाऱ्यांनी गावचे सर्वेक्षण पूर्ण केले. हे काम इंदापूर येथील समाजभूषण शरदकुमार माणिकचंद शहा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हाती घेण्यात आले. या गावात हे काम पूर्ण झाल्यानंतर अद्याप एकही कीटकजन्य साथ गावात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थ तसेच शासनाच्या पैश्यांची बचत झाली असून रुग्णांचा मनस्ताप वाचला आहे. त्यानंतर इतर गावात देखील शेड नेट जाळ्या लावण्याचे नियोजन करण्यात आले.

या उपक्रमात आशा स्वयंसेविकांनी शेड नेट पिशव्या तयार करण्यासाठी मदत केली तर या पिशव्या बसविण्यासाठी ग्रामपंचायत व विविध शाळेतील मुलांची मदत मिळत असून त्यांना यातूनच पर्यावरण संतुलनाचे धडे देण्यात येत आहेत.

सध्या दहा हजार पैकी आठ हजार शेड नेट पिशव्या तयार झाल्या असून त्या बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. राष्ट्रीय कीटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी हा अतिशय किफायतशीर आणि झटपट उपाय आहे. शौचालयाच्या पाठीमागे असणाऱ्या पाईप मधून डासांची मोठ्या संख्येने पैदास होत असते.

ही जाळी बसविल्याने डासांचे बाहेरून आतमध्ये किंवा आतून बाहेर जाण्याचे प्रमाण ९८ टक्क्यांनी कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच डासांच्या पैदास वाढीचे प्रमाण ७७ टक्क्यांनी कमी होत आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल – अमेरिका तसेच गांबिया, बोत्सवाना आणि टांझानिया येथे लंडन स्कूल ऑफ हायजिन, आणि ऑस्ट्रेलिया येथे गार्डन मास्टर यांच्या अध्ययनामधून देखील हे स्पष्ट झाले आहे. प्रगत महाराष्ट्रामध्ये आजही डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांना तोंड द्यावे लागत असल्याने यांसारखे नावीन्यपूर्ण उपक्रम राज्यव्यापी राबविणे गरजेचे आहे.

या उपक्रमाची दखल रयतेचा दरबार यामध्ये दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने देखील घेतली असून पुणे येथील किमान १५०० सोसायट्यांनी या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी डॉ. सुश्रुत शहा यांच्याकडून माहिती घेतली आहे.

कर्मयोगी कारखाना कार्यक्षेत्रातील बिजवडी हे महत्त्वपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र असून कर्मयोगी कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने, जिल्हा आरोग्य समितीचे माजी सदस्य अभिजित तांबिले यांनी डॉ. सुश्रुत श्रेणिक शहा यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button