
इंदापुरमध्ये मांजामुळे शिक्षकाच्या बोटाला इजा
नायलॉन मांजा विक्रीवर बंदीची मागणी
इंदापूर; प्रतिनिधी
शहारातील पुणे-सोलापूर महामार्गावर तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात मंगळवारी ( दि.8 ) जुलै सायंकाळी दुचाकीवर निघालेल्या शिक्षकाच्या हाताला रस्त्यात आडव्या असलेल्या नायलॉन मांजामुळे गंभीर इजा झाली आहे. सुदैवाने मांजा हाताने अडवल्याने तो गळ्याला कापला नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील समर्थ व्यायाम मंडळ संचलित मूकबधिर मुलांच्या शाळेतील शिक्षक शिवाजी शेळवणे हे आपल्या मुलासह दुचाकीवर पुणे-सोलापूर मार्गावरून आपल्या घरातून बस स्थानकाकडे येत असताना तुळजाभवानी देवीच्या मंदिर परिसरात आल्यानंतर रस्त्याच्या मध्ये लोमकळत असलेला नायलॉन मांजा अचानक गळ्याच्या जवळ आला. यावेळी प्रसंगावधान राखत शेळवणेयांनी हात आडवा लावल्याने बोटाला गंभीर इजा झाली.
नायलॉन मांजा विक्रीवर बंदीची मागणी
दरम्यान, दरवर्षीप्रमाणे सणाच्या निमित्ताने अनेक तरुण पतंग उडवण्याचा आनंद घेत असताना नायलॉन किंवा चिनी मांजांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे अपघाताच्या घटना वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना या मांजाचा मोठा धोका आहे. यामुळे याबाबत पोलिस प्रशासनाने ठोस कारवाई करून नायलॉन मांजा विक्रीवर बंदी आणत विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.