नागवेलीच्या विड्याच्या पानाचे भाव घसरले
माजी मंत्री महादेव जानकर यांची मळेधारकांना मदतीची कृषिमंत्र्यांकडे मागणी

नागवेलीच्या विड्याच्या पानाचे भाव घसरले
माजी मंत्री महादेव जानकर यांची मळेधारकांना मदतीची कृषिमंत्र्यांकडे मागणी
इंदापूर;प्रतिनिधि
नागवेलीच्या विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील पान बाजारास माजी मंत्री महादेव जानकर यांनी रविवारी (दि.13) जुलै रोजी भेट देऊन पानमळेधारक, व्यापारी, शेतकऱ्यांशी संवाद साधला. सध्या पानांचे भाव पडले असून, 6 हजार पानांना केवळ 250 रुपये मिळत असल्याने पान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यावर मार्ग काढावा अशी विनंती जानकर यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दूरध्वनीवरून केली. कोकाटे यांनी देखील मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
या वेळी पान उत्पादक ब्रह्मदेव शेंडे, गोरख आदलिंग यांनी सांगितले की, नागवेलीच्या विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकी गावाची अर्थकारणाची बाजू कमकुवत होत चालली आहे. पिकवतो त्याला दाम मिळत नाही. पानमळ्यातून ग्राहकाच्या हातात येईपर्यंतच्या प्रवासात पानउत्पादकांना मोठा खर्च सोसावा लागतो. सध्या फापडा सेज (कळी) गबाळ या पानांचे भाव गडगडले असून, 6 हजार पानांच्या डागाला केवळ 250 रुपये मिळत आहेत. त्यानंतर जानकर यांनी कृषिमंत्री कोकाटे यांच्याशी दूरध्वनी वरून संवाद साधत शेतकऱ्यांची कैफियत सांगितली. तसेच मळेधारकांना चार पैसे मिळावे अशा पद्धतीने ठोस उपाययोजना शासन स्तरावर करावी, अशी मागणी केली. यावर कोकाटे यांनी लवकरच मार्ग काढू, असे सांगितले.
या वेळी कांतीलाल राऊत, अॅड सचिन राऊत, संतोष हेगडे, अण्णा पाटील, विराज पाटील, विशाल जगताप, राहुल बरळ, गणेश पवार, बापू खराडे यांच्यासह शेतकरी, मळेधारक, व्यापारी उपस्थित होते.