
परिचारिका संघटनेचे बारामतीत कामबंद आंदोलन
प्रलंबित मागण्यासाठी कर्मचारी आक्रमक
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर उपशाखा बारामती यांच्या परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी (दि.१७) पासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले.
बारामती उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी कामबंद आंदोलन आंदोलनात सहभाग घेतला.
मुंबई येथे धरणे आंदोलन केले आहे. यामध्ये मुख्यालय लातूर यांच्या एकूण ४५ शाखा राज्यात कार्यरत असून संघटनेतील १०० टक्के परिचारिका संवर्गातील सर्व कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. बारामती शाखेच्या अंतर्गत असलेल्या शहरातील उपजिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय रुई येथील परिसेविका, बाल रुग्णतज्ज्ञ परिचारिका तसेच अधिपरिचारिका यांचा सहभाग आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये सेवा देताना बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या आहेत.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये वेतन त्रुटी, सेवा प्रवेश नियम, दर तीन ते चार वर्षांनी होणाऱ्या प्रशासकीय बदल्यांमुळे परिचारिका संवर्गातील कुटुंबाचे स्थायीकरण होत नाहीत. मुलांच्या शिक्षणासाठी असंख्य अडचणी निर्माण होत असून प्रशासकीय बदली रद्द, राज्य सुश्रुषा सेल स्थापन करणे, परिचर्या सर्व संवर्गाचे कंत्राटीकरण रद्द करून परिचारिका संवर्गातील सर्व स्तरावरील पदनिर्मिती व पदभरती तसेच केंद्र शासनाप्रमाणे नर्सिंग भत्ता, गणवेश भत्ता, शैक्षणिक वेतन वाढ पदनाम बदल,
अशा प्रलंबित मागण्यांकरिता बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर यांच्या वतीने घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने त्यांच्या सर्व मागण्यांचा विचार करून त्या मान्य कराव्यात, असे बारामतीत आंदोलक परिचारिककांनी सांगितले.