उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतण्या युगेंद्र पवारांचा साखरपुडा संपन्न
संपूर्ण पवार कुटुंबाने हजेरी लावली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतण्या युगेंद्र पवारांचा साखरपुडा संपन्न
संपूर्ण पवार कुटुंबाने हजेरी लावली
बारामती वार्तापत्र
राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कुटुंबामध्ये आणखी एक लग्नाचा बार उडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा साखरपुडा आज संपन्न झाला.
मुंबईतील प्रभादेवी येथील इंडियाबुल्स इमारतीत युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा शाही साखरपुडा पार पडला. या सोहळ्याला ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबाने हजेरी लावली होती, ज्याचे फोटोही आता समोर आले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे, बंधु श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच युगेंद्र पवार यांचा तनिष्का कुलकर्णीशी विवाहसोहळा निश्चित झाला होता, ज्याचे फोटोही समोर आले होते. मुंबईमध्ये युगेंद्र पवार आणि तनिष्काचा साखरपुडाही संपन्न झाला.
मुंबईतील प्रभादेवी येथे झालेल्या या सोहळ्याला संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होते. राजकारणात एकमेकांच्या विरोधात असणारे पवार कुटुंब या सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. या सोहळ्यासाठी युगेंद्र पवार यांनी गुलाबी रंगाचा सदरा आणि जॅकेट घातले होते तर तनिष्काने गुलाबी साडी नेसली होती. या सुंदर जोडीचे फोटोही आता माध्यमांवर व्हायरल होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांची साथ देत राजकारणात सक्रीय होण्याचा निर्णय घेतला होता. बारामती लोकसभेसह विधानसभा निवडणुकीत त्यांनी काका अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटले होते. शरद पवार यांच्या पक्षाकडून त्यांना विधानसभेची उमेदवारीही मिळाली होती. या निवडणुकीत काका अजित पवार यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. सध्या ते बारामतीच्या राजकारणात सक्रीय सहभाग घेताना दिसत आहेत.