
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका ऐन दिवाळीत पार पडणार?
गट-गणात इच्छुकांची चाचपणी!
बारामती वार्तापत्र
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका ऐन दिवाळीत पार पडणार असल्याने अनेक इच्छुकांनी गण आणि गटात चाचपणी सुरू केली आहे. मागील काही निवडणुकींचा विचार करता उपमुख्यमंत्री अजित पवार तरुणांना संधी देण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.
बारामती तालुक्यात गट व गणांची संख्या पूर्वीप्रमाणेच 6 व 12 अशी राहिली आहे. नव्या पुनर्रचनेत सांगवी गणाचे अस्तित्व संपुष्टात आले. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर लोकसभेचा अपवाद वगळता विधानसभा आणि माळेगाव कारखान्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकहाती सत्ता काबीज केली आहे.
अजित पवार यांच्या गटाकडे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच बारामती नगरपरिषदेची सत्ता राखण्याचे आवाहन आहे. मित्रपक्ष असलेल्या भाजपने गेल्या सहा महिन्यांपासून बारामती तालुक्यात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे अजित पवार गटाकडून देखील रणनीती आखली जात आहे.
तालुक्यातील सहकार क्षेत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकहाती वर्चस्व आहे. सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती सहकारी साखर कारखाना, बाजार समिती, दूध संघ, खरेदी-विक्री संघ, नगरपालिका, बारामती सहकारी बँक, पुणे जिल्हा बँक आदींसह अन्य सहकारी संस्थांवर पवार यांचे वर्चस्व आहे.
सहकारावर अजित पवार यांनी मजबूत पकड निर्माण केली आहे. त्यामुळे तळागाळापर्यंत पवार यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते भक्कम आहेत. गेल्या काही निवडणुकीत अजित पवार यांनी तरुणांचा सहभाग वाढविला आहे.
तरुण निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली असून, त्यातून बारामतीच्या राजकीय पटलावर तरुणांची दुसरी फळी तयार करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे येणार्या निवडणुकीत देखील पवार यांच्याकडे तरुण उमेदवारांची संख्या सर्वाधिक राहणार आहे. कित्येक वर्षांपासून पदाला चिटकून राहिलेल्या पदाधिकार्यांना यामुळे थांबावे लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीत अनेक पदाधिकार्यांच्या नाराजीचा फटका खा. सुनेत्रा पवार यांना बसला. त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर पवार यांनी तालुक्यात अपेक्षित बदल केले.
तालुक्यातील रणनीती बदलून त्यांनी आक्रमक होत सुधारणा केल्या आहेत. बारामती नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तरुण पिढीला वाव देणार असल्याने अनेक तरुणांनी पवार यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी विविध क्लृप्त्या सुरू केल्या आहेत.
तेच ते चेहरे; मतदारदेखील नाराज
गेल्या दहा वर्षांपासून अनेक पदाधिकारी पक्षासाठी सक्रिय नसतानाही पदाला चिटकून राहिले आहेत. वारंवार तेच तेच चेहरे बघून मतदारही नाराज होत आहेत. त्यामुळे निवडणुकीत नवीन, उच्चशिक्षित, तरुण आणि पक्षासाठी वेळ देणार्या चेहर्यांना संधी देण्याची गरज व्यक्त होत आहे.