पवारांच्या बालेकिल्ल्यात लक्ष्मण हाकेंची जाब मागणीची गर्जना; जरांगेंचा उल्लेख करत घेरले
गावगाड्यात ओबीसी ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

पवारांच्या बालेकिल्ल्यात लक्ष्मण हाकेंची जाब मागणीची गर्जना; जरांगेंचा उल्लेख करत घेरले
गावगाड्यात ओबीसी ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती हे नेहमीच चर्चेचं केंद्र राहिलं आहे. त्यातही पवार कुटुंब आणि सत्तेचा गाठोडा हा कायमच चर्चेत असतो. मात्र, याच कुटुंबावर आता थेट निशाणा साधला आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्याने ओबीसी समाजात असंतोष पसरला आहे.
याच पार्श्वभूमीवर हाके यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. “शरद पवारांनी मनोज जरांगेंना उभं केलं आणि महाराष्ट्राच्या मानगुटीवर भूत बसवलं,” असा घणाघात हाके यांनी केला.
प्रकाश आंबेडकरांचा फोनिक संवाद
हाके यांचं भाषण सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा फोन आला. आंबेडकरांनी उपस्थित जनसमुदायाशी फोनवरून संवाद साधला आणि म्हणाले, “जबरदस्तीने दिलेलं आरक्षण आम्हाला मान्य नाही. ओबीसींना रस्त्यावर उतरावं लागेल.” या संवादाने सभेला आणखी धार आली.
तर त्याचं कानफाड फोडा : लक्ष्मण हाके
हाके यांनी शरद पवारांवर टीका करताना मंडल आयोगाच्या मुद्द्यावरूनही हल्ला चढवला. “मंडल आयोग शरद पवारांनी लागू केला असं कोणी म्हणालं, तर त्याचं कानफाड फोडा,” असं ते म्हणाले. मंडल आयोगाची चळवळ शेकापचे दि. बा. पाटील, बबनरावजी ढाकणे, शिवाजीभाऊ शेंडगे, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, अरुण कांबळे आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी यशस्वी केल्याचं त्यांनी सांगितलं. “शरद पवार मतं ओबीसींची घेतात आणि जरांगेंना पाठिंबा देतात,” असा आरोपही त्यांनी केला.
शरद पवारांवर वैयक्तिक टीका
हाके यांनी शरद पवार यांना ४०० संस्थांचे अध्यक्ष असल्याचा टोला लगावला. “कुटुंबाबाहेर कारखाने, आमदारकी, खासदारकी जाऊ न देणारे शरद पवार रयत शिक्षण संस्था आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष कसे झाले? महाराष्ट्रात मुख्यमंत्रीच रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष होतो, पण शरद पवारांनी नियम बदलून स्वतः त्या पदावर कब्जा केला,” असा गंभीर आरोप हाके यांनी केला.
अजित पवारांवरही हल्ला
अजित पवारांवरही हाके यांनी जोरदार टीका केली. “कॅनलच्या कंपाऊंडवर गोधडी वाळत घातली तर बघा, असं अजित पवार म्हणाले. पण हे कंपाऊंड तुझ्या बापाचं आहे का?” असा थेट सवाल त्यांनी विचारला. “सत्तेतून पैसा, पैशातून कारखाने आणि पुन्हा सत्ता, असं चक्र अजित पवार चालवतात. सत्ता कोणाचीही असो, यांचा मंत्रिमंडळात समावेश असतोच,” असं हाके म्हणाले.
ओबीसी विरुद्ध डुप्लिकेट ओबीसी”
हाके यांनी मराठा-ओबीसी वादावर भाष्य करताना म्हटलं, “आतापर्यंत ओबीसी विरुद्ध ओबीसी लढत होती. आता जर ओबीसीचं आरक्षण पडलं, तर पुढच्या निवडणुकीत ओबीसी विरुद्ध डुप्लिकेट ओबीसी अशी लढत होईल.” यामुळे मराठा आणि ओबीसी समाजातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.