“उद्योगासाठी कच्चा माल पुरवतो” गृहोद्योगाच्या नावाखाली 90 महिलांची लाखोंची फसवणूक; बारामतीतील लबाड दाम्पत्याने घातला गंडा
२ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक

“उद्योगासाठी कच्चा माल पुरवतो” गृहोद्योगाच्या नावाखाली 90 महिलांची लाखोंची फसवणूक; बारामतीतील लबाड दाम्पत्याने घातला गंडा
२ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक
बारामती वार्तापत्र
गृहिणींना उद्योगासाठी कच्चा माल पुरवण्याचे आमिष दाखवून सुमारे ९० महिलांची २ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. या प्रकरणी बारामती येथील सुनील नारायण शिराळकर आणि सविता सुनील शिराळकर या दाम्पत्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रागिणी सुधीर धोंगडे (४३, रा. आळे, जि. पुणे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिराळकर दाम्पत्याने ‘महिला उद्योगवर्धिनी’ या संस्थेच्या नावाने टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी महिलांना राखी आणि जपमाळ तयार करण्यासाठी कच्चा माल पुरवण्याचे आश्वासन दिले होते. या आमिषाने त्यांनी ऐंशी ते नव्वद महिलांकडून २ लाख ७० हजार रुपये जमा केले.
पैसे घेतल्यानंतरही शिराळकर दाम्पत्याने महिलांना गृहोद्योगासाठी कोणताही कच्चा माल पुरवला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रागिणी धोंगडे यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, शिराळकर दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपनिरीक्षक शिरसाट यांनी सांगितले की, प्राथमिक तपासामध्ये जवळपास ९० महिलांकडून पैसे घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आणखी काही महिलांची फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे महिलांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.